पंतप्रधानांच्या हस्ते ‘डिजिटल इंडिया वीक’चा शुभारंभ
ऑनलाईन क्रांतीमुळे अनेक समस्यांवर उत्तर मिळाल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ गांधीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात येथील गांधीनगरमध्ये ‘डिजिटल इंडिया वीक-2022’ याचे उद्घाटन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडियास्टेक ग्लोबल, मायस्कील, डिजिटल इंडिया भाषा, डिजिटल इंडिया जेनेसिस, चिप्स टु स्टार्टअप आणि ई बुक यासह अन्य विविध डिजिटल नव्या सेवांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
21 व्या शतकात ज्याचा जन्म झाला आहे, त्यांना डिजिटल सेवांचा खूप छान लाभ झाला आहे. मागील 8 ते 10 वर्षांच्या अगोदरच्या स्थितीचा कालावधी पाहिल्यास यामध्ये जन्म प्रमाणपत्र, बँकांच्या कामांसाठी, रेशन घेण्यासाठी, बिले जमा करण्यास व ऍडमिशन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र सध्या या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्यामुळे या समस्यांवर उत्तर मिळाले असल्याचे पहावयास मिळत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(डीबीटी) याच्या माध्यमातून मागील आठ वर्षांमध्ये थेट लाभार्थ्यांकरीता बँकेत अनुदान देण्यात आले आहे. टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे देशातील 2 लाख 23 हजार कोटी रुपयांची रक्कम ही अन्य कोणाच्या हातात जाण्याऐवजी थेट लाभार्थ्यांनाच प्राप्त झाल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला आहे.
प्रदर्शनात विविध प्लॅटफॉर्मवर भर
स्टार्टअप, सरकार, विविध उद्योग आणि एज्युकेशन सेंटर्समधील भागीदारांसह 200 पेक्षा अधिक स्टॉलसोबत डिजिटल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय युनिकॉर्न, स्टार्टअपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या टेक्नॉलॉजीवर आधारीत सोल्यूशनही 7 ते 9 जुलैच्या दरम्यान व्हर्च्युअल मोडवर आयोजित करण्यात आले आहे.