प्राथमिक शिक्षकांचे बदली कौन्सिलिंग पूर्ण
1689 शिक्षकांनी घेतला सहभाग : आजपासून हायस्कूल शिक्षकांना संधी
बेळगाव : मागील दोनवेळा रखडलेली शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रिया अखेर पूर्ण होऊ लागली आहे. मराठा मंडळाच्या जिजामाता हायस्कूल येथे सुरू असलेल्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांचे कौन्सिलिंग गुरुवारी पूर्ण झाले. बेळगाव शैक्षणिक जिह्यातील एकूण 1689 प्राथमिक शिक्षकांनी कौन्सिलिंगमध्ये सहभाग घेतला होता. बदली कौन्सिलिंग राबविल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दीड ते दोन महिन्यांपूर्वी शिक्षक बदली कौन्सिलिंग सुरू करण्यात आले होते. परंतु राज्य सरकारकडून सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याने ही प्रक्रिया थांबली होती.
मंगळवारपासून या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्यात आली. तीन दिवसांमध्ये प्राथमिक विभागाचे कौन्सिलिंग पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर पहिल्या दिवशी मुख्याध्यापकपदाचे कौन्सिलिंग झाले. शुक्रवारपासून हायस्कूल शिक्षकांचे कौन्सिलिंग घेतले जाणार आहे. बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिजामाता हायस्कूल येथे सोय करण्यात आली आहे. कौन्सिलिंगमधील शिक्षकांना त्यांच्या क्रमांकानुसार शाळांची यादी मोठ्या पडद्यावर दाखविली जात आहे. शिक्षकांना आपल्या इच्छेनुसार त्यापैकी एका शाळेची निवड करावी लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेले कौन्सिलिंग पूर्ण होत असल्याने शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत कौन्सिलिंगची प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर विभागीय स्तरावरील कौन्सिलिंगला सुरुवात होणार आहे.