Primary Health Hospital: कोपार्डेतील आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी, ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण होणार
गायरानमधील 1 हेक्टर जागा आरोग्य केंद्रास देण्याचा जिल्हाधिकारी येडगे यांचा आदेश
By : प्रा. एस. पी. चौगले
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोपार्डे या जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून गेली काही वर्षे जागेच्या प्रश्नामुळे हे आरोग्यकेंद्र रखडले होते. मात्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गायरानमधील 1 हेक्टर जागा आरोग्य केंद्रास देण्याचा आदेश दिल्याने या केंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी होत आह करवीर तालुक्यातील कोपार्डे हे गाव कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गशेजारी वसलेले आहे. या गावाचा सध्या मोठा विस्तार झाला आहे. सांगरूळ फाटा येथे मोठे व्यावसायिक केंद्र आणि बाजारपेठ निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर या गावाच्या रस्त्यालगत असण्राया सुमारे साडे पाच- सहा एकर जागेत 6 एप्रिल 1996 मध्ये तत्कालीन सरपंच एस.के.पाटील यांच्या पुढाकाराने जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला. सध्या हा जनावरांचा बाजार जिह्यात अग्रेसर ठरला असून या ठिकाणी भाजीपाला, मिरची, शेती अवजारे साहित्य विक्री करण्यासाठी वेगळा बाजार भरत आहे.
त्यामुळे या परिसरातील आर्थिक चक्र गतिमान झाले आहे. या गावाच्या हद्दीत कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, बँका, शाळा, महाविद्यालये व विविध व्यवसाय असून त्यामुळे या परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या सांगरुळ फाटा, कोपार्डे ही गतीने विकसित होणारी बाजारपेठ आहे.
यापूर्वी या गावात मुख्य रस्त्यालगत आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहे. मात्र परिसरातील वाढती नागरी वस्ती लक्षात घेता या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज होती. ग्रामपंचायतीने याबाबत पाठपुरावा केला आणि त्याला यश आले. शासनाच्या दि. 4 मार्च 2024 च्या आदेशाप्रमाणे विशेष बाब म्हणून कोपार्डे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले.
ग्रामपंचायतीने मासिक ठराव क्र.9 अन्वये 10 जुलै 2024 रोजी कोपार्डे येथील गट क्रमांक 198 अ मधील 1 हेक्टर जागा आरक्षित ठेवण्याच्या ठराव केला. करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी 24 सप्टेंबर 2024 रोजी ठराव संमत केला आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दि.28 जानेवारी 2025 अन्वये शिफारस केली आहे.
कोपार्डे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी या जागेचा नकाशा सादर केला असून त्यामध्ये प्रस्तावित जागेस पोहोच रस्ता असून मंडल अधिकारी यांचे पंचनाम्यामध्ये याबाबत नमूद केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी कोपार्डे येथील गायरान गट क्रमांक 198 अ एकूण क्षेत्र 10.86 हेक्टर मधील 1 हेक्टर क्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्राकरता मिळणेबाबत शिफारस केली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार चंद्रदीप नरके यांनी या आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेमधून होत आहे. गेली काही वर्ष आरोग्य केंद्राची मागणी रखडली होती. माजी खासदार संजय मंडलिक व आमदार चंद्रदीप नरके यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
जिल्हा नियोजनमधून इमारतीसाठी निधी आणणार
"आमदार चंद्रदीप नरके यांनी, आपण यापूर्वी या आरोग्य केंद्राच्या जागेसाठी पाठपुरावा केल्याचे सांगून आता जिल्हा नियोजन किंवा राज्याच्या बजेटमधून या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत,डॉक्टर्स स्टाफ आणि अन्य सुविधांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले."
- आमदार चंद्रदीप नरके
4 वर्षाच्या पाठपुराव्याला यश मिळाले
"गेली 4 वर्षे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेसाठी पाठपुरावा केला,त्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार, माजी खासदारांचे सहकार्य मिळाले. आता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी निधी द्यावा."
- सागर बुरुड, समतावादी महासंघाचे जिल्हाध्यक्ष
जनतेची सोय झाली
"करवीर तालुक्यातील कोपार्डे हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होत आहे ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रात अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने जनतेची सोय झाली."
- सविता पाटील, सरपंच