For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भिल्लगौरव

06:36 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भिल्लगौरव
Advertisement

श्री रामकथा कितीही वेळा ऐकली-वाचली तरी मन तृप्त होत नाही; कारण त्यातील विशालता, अथांगता. माणसाला चिरंतन मूल्यांची ओढ ही स्वाभाविक असते. त्याकडे तो खेचला जातो. श्रीरामांची सेवा, श्रीरामांची मातृ-पितृभक्ती, त्यांचे बंधुप्रेम, औदार्य, संयम, सरळ स्वभाव, त्याग आणि श्रीरामांचे नाम या गोष्टी हृदयात साठवून जीवनात आणण्यासाठी एक जन्म पुरत नाही.

Advertisement

रामायणामध्ये श्रीराम आणि निषादराज गुह यांच्या भेटीचे वर्णन आहे. शृंगवेरपूर हे भिल्लांचे शहर आहे. भिल्लांचा राजा गुह याचे तिथे राज्य आहे. श्रीराम मृगयेसाठी जात होते तेव्हा त्यांची निशादराज गुह यांच्याशी मैत्री झाली होती. साक्षात भगवंताने मैत्री केली की ती चिरंजीव होते. तिला प्रेमस्पर्श लाभतो. श्रीरामचरितमानस या ग्रंथामध्ये शृंगवेरपूर येथे श्रीराम, जानकी लक्ष्मणासह वनवासात जातेसमयी गेले त्याचे वर्णन आहे. फळे-फुले घेऊन गुहराजा श्रीरामांच्या दर्शनाला आला. दुरूनच श्रीरामांच्या चरणांवर त्याने दंडवत घातला. त्याचे डोळे भरून आले. रामदर्शनाने त्याची भावसमाधी लागली. त्याची ही भावावस्था पाहून श्रीराम धावले आणि त्यांनी त्याचा हात पकडून त्याला उभे केले. श्रीरामांनी गुहराजाला गाढ आलिंगन दिले. हे सारे गुहाच्या कल्पनेपलीकडे होते. गुहाला असे वाटत होते की श्रीरामांनी एकदा जरी आपल्याकडे नजर टाकली तरी पुरे. श्रीरामांनी तर गुहाला गाढ असे आलिंगनच दिले. त्या क्षणी गुह देहभान विसरला आणि श्रीरामरूप झाला.

संत तुलसीदास म्हणतात, इथेच श्री रामराज्याचे उद्घाटन झाले. रामराज्य म्हणजे प्रेम. रामायण हा प्रेमग्रंथ आहे. गुहराज श्रीरामांना म्हणाला, आज तुम्ही माझा बेडा पार करून दिला. गुहाने श्रीरामांना एक रात्र तिथे मुक्काम करण्याची विनंती केली. ती श्रीरामांनी मान्य केली. श्रीरामांनी दिवसभर तेथील भिल्लांशी संवाद साधला. भिल्लांनी श्रीराम-जानकी यांच्यासाठी तृणशय्या तयार केली. भोवताली कुंपण तयार केले. गुहराजाने आपल्या बांधवांना सांगितले की श्रीरामांच्या निद्रेमध्ये विक्षेप येऊ नये, हिंसक प्राणी आजूबाजूला फिरकू नयेत म्हणून हातात शस्त्र घेऊन रात्रभर चहू बाजूने पहारा द्या. सर्व भिल्लांना याचे आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले की आपल्या गावात तर कधीच कुठलाही प्राणी फिरकत नाही. आज आपल्या राजाला असे का बरे वाटले? त्यामागे गुहराजाची एक युक्ती होती. तमसा नदीच्या किनारी अयोध्यावासी झोपेत असतानाच श्रीराम त्यांना सोडून चालले गेले. माझे गावही जर झोपून गेले तर न जाणो श्रीराम इथूनही न सांगताच निघून जातील. म्हणून त्याने संपूर्ण गावाला जागेच ठेवले. त्या रात्री लक्ष्मणाने गुहराजास उपदेश केला आहे.

Advertisement

राजपरिवार आणि अयोध्यावासियांसहित जेव्हा भरत श्रीरामांना भेटायला निघाले, तेव्हा शृंगवेरपूरजवळ आले. गुहराज त्यांना सामोरे गेले. प्रथम वशिष्ठ ऋषींना आपला परिचय देऊन त्यांनी दंडवत घातला. वशिष्ठांनी भरताला गुहाची ओळख करून देताना म्हटले, ‘हा रामसखा आहे.’ हा शब्द ऐकताच परमआदराने व आनंदाने भरताने रथातून उडी मारली आणि गुह राजाला घट्ट आलिंगन दिले. भरत आणि गुह हे रामभक्त एकमेकांना भेटले तेव्हा आकाशस्थ देवतांनी भरत आणि गुहराजावर पुष्पवृष्टी केली.

रामभक्त शबरीला डोंगरे महाराज ‘प्रेममूर्ती’ म्हणतात. श्रीराम जेव्हा शबरीच्या आश्रमाकडे निघाले तेव्हा चहुबाजूंनी राम, राम हा गोड नाद परिसरात निनादत होता. संत तुलसीदास म्हणतात, वारा राम, राम गात होता. तर भुंगे श्रीरामांचे गुंजन करीत होते. पाने, वृक्ष यांच्या बुंध्यातून राम, राम आवाज येत होता. तेव्हा लक्ष्मणाने चकित होऊन श्रीरामांना विचारले की प्रभू इथल्या कणाकणात राम, राम जप चाललाय हे कसे काय? तेव्हा श्रीराम म्हणाले, आपण आता एका महान स्त्राr संतांच्या दर्शनाला चाललो आहोत. हा तिचा नाद आहे. शबर म्हणजे भिल्ल. शबरी म्हणजे भिल्लीण. शबरीने आयुष्यभर श्रीरामांची प्रतीक्षा केली. शबरीच्या पर्णकुटीत परब्रम्ह आले. संत तुलसीदास म्हणतात, ‘सबरी देखी राम गृह आये। मुनी के वचन समुझि जियॅ भाये’ । शबरीच्या अंत:करणात जे भगवंताचे रूप साकारले होते त्याच रूपात प्रभू शबरीच्या आश्रमात आले. श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्ती सांगितली आणि विचारले, ‘जनकसुता कई सुधीभामिनी। जान ही कहू करीबर गामीनी’। हे शबरी, जनकपुत्री सीता कुठे आहे? हे तुला माहित असेल तर सांग. तेव्हा शबरी म्हणाली, ‘प्रभू तुम्ही सर्वज्ञ असून मला मोठेपणा देण्यासाठीच हे विचारत आहात.’ शबरीने सीताशोधाचा मार्ग भगवंताला सांगितला आणि योगाग्नी शरीरात प्रज्वलित करून ती रामरुप झाली.

श्रीमहाभारतामध्ये एकलव्य या शिष्याची कथा आहे. गुरूभक्त एकलव्य हा भिल्लपुत्र होता. द्रोणाचार्य हे राजगुरू होते. धनुर्विद्या शिकण्यासाठी मोठमोठे राजकुमार शिष्य त्यांच्याकडे येत. अर्जुनाचेही तेच गुरू होते. एकलव्याने द्रोणाचार्यांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी विनंती केली परंतु ती त्यांनी अमान्य केली. तेव्हा बुद्धिशाली एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरू मानून आपादमस्तक न्याहाळले आणि त्यांची मूर्ती तयार केली. मूर्तीला गुरू मानून, पूजा करून धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला. एकलव्याचे तादात्म्य आणि एकाग्रता इतकी विलक्षण होती की द्रोणाचार्यांची सर्व शक्ती मूर्तीमध्ये प्रकट झाली. एकलव्याने प्रेम, श्रद्धा आणि आत्मीयता या गुणांनी गुरूंची सर्व शक्ती खेचून घेतली. एकलव्य दिव्यध्यानसंपन्न झाला. सर्व विद्या प्रकट झाली. त्याचे अंत:चक्षू उघडले. एकलव्यापासून आपण मूर्तीशास्त्राचा धडा घ्यायचा आहे. मूर्तीत भावना, प्रेम, हृदय ओतले की शक्ती प्रकट होते. ध्यानात ती सर्व बोलू शकते.

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांना शूलपाणेश्वराच्या जंगलामध्ये अश्वत्थामाने भिल्लरूपात दर्शन दिले. प.प. स्वामी जेव्हा कातखेड्यावरून गरुडेश्वर येथे यायला निघाले तेव्हा वाटेत घोर जंगल लागले. रस्ता चुकण्याची शक्यता असताना एक भिल्ल स्वामींसमोर येऊन उभा राहिला व त्याने विचारले, ‘तुम्हाला कुठे जायचे आहे?’ स्वामी म्हणाले, ‘गरुडेश्वरला.’ तेव्हा तो भिल्ल म्हणाला, ‘माझ्या मागून या. मी जवळचा रस्ता दाखवतो.’ स्वामींच्या मनात आले हा कुणी सामान्य भिल्ल नाही. स्वामी म्हणाले, ‘खरे, खरे सांग, तू कोण आहेस?’ त्यावर तो भिल्ल म्हणाला, ‘मी अश्वत्थामा असून या जंगलात राहतो.’ नंतर अश्वत्थामा या मूळ रूपात दर्शन देऊन पुन्हा भिल्लरूपात प्रकट होऊन तो दिसेनासा झाला.

नर्मदाकिनारी भिल्ल प. प. टेंबे स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत. आपल्या अचूक निशाणबाजीचे खेळ ते स्वामींना करून दाखवत. एखाद्या उंच झाडावर नारळ बांधून अंगठा न लावता बाण मारून त्या नारळाचा अचूक वेध घेत. त्यांचे हस्तलाघव विलक्षण होते. त्यांच्या हातात कायमच धनुष्यबाण असे. स्वामी म्हणाले, ‘भिल्ल मंडळींकडून शुद्ध भाव शिकावा. प्रेम शिकावे. त्यांचे मन शुद्ध आणि निरागस आहे.’ सद्यकाळातही नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना आजही भिल्ल भेटतात. शुद्ध भावनेने परिक्रमा करणाऱ्या साधकाला ते सर्वतोपरी मदत करतात. निसर्गाचा ठेवा त्यांनी सांभाळला आहे. परमात्मा आणि नर्मदा माता यांचे ते लाडके पुत्र आहेत.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.