For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1June Pride Month जगभरातील तृतीयपंथीय, लेस्बियन, गे समुदायासाठी अभिमानास्पद असणारा प्राईड मंथ नेमका काय आहे?

03:07 PM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
1june pride month जगभरातील तृतीयपंथीय  लेस्बियन  गे समुदायासाठी अभिमानास्पद असणारा प्राईड मंथ नेमका काय आहे
Advertisement

१ जून या दिवशी जगभरातील क्वियर कम्युनिटी अर्थात LGBTQI समुदाय प्राईड मंथ म्हणजेच अभिमानाचा महिना म्हणून साजरा करतो.  अमेरिकेसह जगभरातील तृतीयपंथीय, लेस्बियन, गे आणि असेक्शुअल अर्थात अलैंगिक ओळख असणाऱ्या सर्व व्यक्ती १ जूनचा दिवस प्राईड मंथ म्हणून साजरा करतात. याच दिवसाचा इतिहास आणि माहिती सांगणारे हे वृत्त.

Advertisement

अमेरिकेतून सुरुवात

अमेरिकेत जून महिना LGBTQ+ अभिमान महिना म्हणून साजरा केला जातो. LGBTQ+ अभिमान महिना हा “लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर समुदायासाठी समान न्यायाच्या अविरत प्रयत्नांची आठवण आणि LGBTQ व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा महिना म्हणून साजरा केला जातो

Advertisement

कामाच्या ठिकाणी आणि त्यापलीकडेही, प्रत्येकाला प्रगती करण्यास मदत करणाऱ्या अधिक समावेशक जागा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच्या संघर्षाचा प्रेरणादायी दिवस म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

प्राईड मंथ हा महिना जून १९६९ च्या स्टोनवॉल आंदोलनाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. हे आंदोलन अमेरिकेतील समलैंगिक हक्कांसाठीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी एक होते . स्टोनवॉल इन नावाच्या मॅनहॅटनमधील एका समलैंगिक क्लबवर पोलिसांनी केलेल्या हिंसक छाप्याच्या पार्श्वभूमीवर स्टोनवॉल दंगली उसळल्या होत्या; या छाप्यानंतर अनेक दिवस निदर्शने आणि संघर्ष सुरू होते. अमेरिकेच्या इतिहासात हे आंदोलन अत्यंत प्रसिद्ध आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षाची घोषणा

स्टोनवॉल आंदोलनानंतर एका वर्षानंतर पहिल्या न्यूयॉर्क सिटी प्राइड मार्चमध्ये हजारो लोकांनी समलैंगिक हक्कांसाठी मोर्चा काढला. कालांतराने, हे कार्यक्रम आणि आंदोलनाच्या आठवणी जागवणारी मोहिम संपूर्ण जून महिनाभर साजरे केले गेले आणि १९९९ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पहिली “गे अँड लेस्बियन प्राइड मंथ” घोषणा जारी केली.

पहिली गे ​​प्राइड परेड स्टोनवॉल दंगलींच्या वर्षपूर्तीच्या दिवशी आयोजित करण्यात आली होती, परंतु अमेरिकन सरकारने १९९९ मध्ये जून महिना 'प्राइड मंथ' म्हणून प्रथम मान्यता दिली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ मध्ये जून महिना 'एलजीबीटी प्राइड मंथ' म्हणून घोषित केला आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २०२१ मध्ये जून महिना 'एलजीबीटीक्यू प्राइड मंथ' म्हणून घोषित केला. ज्यो बायडन यांनी घोषित केलेल्या प्राईड मंथमध्ये संपूर्ण क्विअर कम्युनिटीला सामावून घेण्यात आले. 

प्राईड हिस्ट्री आणि प्राईड मंथ यातला फरक

LGBT+ हिस्ट्री मंथ हा LGBTQ+ प्राईड मंथपेक्षा वेगळा असून, तो ११ ऑक्टोबर रोजीच्या राष्ट्रीय 'कमिंग आऊट डे' सोबत ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. “ LGBT+ हिस्ट्री मंथ आदर्श व्यक्तींचा सन्मान करतो, समुदायाबद्दल विश्वास निर्माण करण्याचे आश्वासन देतो आणि LGBTQI कम्युनिटीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगदानाबद्दल नागरी हक्कांबद्दल आवाज उठवतो.”

या महिन्यात पार्ट्या आणि संगीत कार्यक्रमांपासून ते कार्यशाळा आणि शिकण्याच्या संधींपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तथापि, मोठ्या शहरांमधील मिरवणुका सामान्यतः LGBTQ+ प्राइड महिन्याचे सर्वात जास्त दिसणारे घटक असतात.

जगभरातील इतर देशही अभिमान महिना साजरा करतात

प्राइड मंथचे सोहळे केवळ अमेरिकेतच मर्यादित नाहीत. जगभरात आणि व्हर्च्युअलीसुद्धा हे स्मरणोत्सव आणि सोहळे साजरे केले जातात, जरी अनेक देश जून महिन्याला अधिकृतपणे प्राइड मंथ म्हणून घोषित करत नसले तरी. प्राइड मंथच्या सोहळ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये खालील देशांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, स्पेन, नेदरलँड, अर्जेंटिना, तैवान, जपान या देशात मोठ्या संख्येने प्राईड मंथ साजरा केला जातो.

पारलिंगी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं? 

अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात पारलिंगी महिला चळवळीत काम करणाऱ्या कादंबरी शेख यांच्याशी या विषयावर चर्चा केली तेव्हा त्यांनी या दिवसाचे महत्त्व आणि आपल्या कामाविषयी माहिती दिली. प्राईड मंथच्या निमित्ताने यावर्षी कोल्हापूरात केल्या होणाऱ्या कार्यक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली.

त्या म्हणाल्या "रेनबो रूट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून यावर्षी प्रथमच कोल्हापूर येथे अभिमान पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, बेंगलोर आणि देशभरातील विविध शहरांमध्ये आयोजित होणाऱ्या प्राईड कार्यक्रमांना संस्थेमार्फत सातत्याने सहकार्य व सहभाग दिला जातो. विविध CBO, NGO संस्था, समुदाय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा, मानवी हक्क संघटना आणि मुख्य प्रवाहातील विविध क्षेत्रातील व्यक्ती संविधानिक मूल्यांना अनुसरून या चळवळीला समर्थन देत असतात".

पुढे त्या म्हणाल्या यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्राईड मंथ नव्या सामाजिक आणि कायदेशीर संदर्भांसह साजरा केला जाणार आहे. ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्क, संरक्षण, सन्मान आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती केली जाईल. विविध सामाजिक प्रश्न, धोरणात्मक मागण्या, कायदेशीर हक्क आणि समुदायाच्या वास्तव परिस्थितीबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जून महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

प्राईड मंथ आणि संघटना

प्राईड मंथच्या निमित्ताने पुणे स्थित मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून देखील तृतीयपंथी महिला व समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि सन्मानाच्या प्रश्नांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. समाज अधिक सुदृढ, शांततामय आणि सर्वसमावेशक व्हावा यासाठी अभिमान पदयात्रा आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत अशी माहिती पारलिंगी महिला कार्यकर्त्या कादंबरी शेख यांनी दिली.

तरुण भारतशी संवाद साधताना शेख म्हणाल्या "माणसातील माणूसपण जपत, माणुसकीने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळावा, कोणताही भेदभाव न होता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे, या विचारांचा उत्सव म्हणजे प्राईड मंथ होय. भारतासह जगभरामध्ये साजरा होणारा हा महिना सामाजिक न्याय, समानता आणि मानवी मूल्यांची नव्याने आठवण करून देणारा आहे".

Advertisement
Tags :

.