For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम मंदिर उभारणीच्या स्वप्नपूर्तीचा अभिमान आणि आनंद !

01:21 PM Jan 21, 2024 IST | Kalyani Amanagi
राम मंदिर उभारणीच्या स्वप्नपूर्तीचा अभिमान आणि आनंद
Advertisement

हिंदू एकता आंदोलनाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी हृदयापासून व्यक्त केल्या भावना : 90 च्या दशकात समान नागरी कायद्यासह राममंदिर उभारणीसाठी उभारला होता लढा : 1987 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक सिंघल यांची कोल्हापूर भेट आजही अविस्मरणीय

Advertisement

संजीव खाडे/ कोल्हापूर

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराची उभारणी होऊन आता त्यात रामल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सोमवारी 22 जानेवारीला होतो. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी साडेतीन चार दशकांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता साकारत आहे, त्याचा केवळ आनंदच नाही तर अभिमान आहे, अशा शब्दात हिंदू एकता आंदोलन या एकेकाळच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना आपल्या भावना मांडल्या.

भारताच्या इतिहासात सोमवार 22 जानेवारी 2024 हा दिवस राममंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस म्हणून सुवर्णदिन म्हणून नोंद होणार आहे. राम जन्मभूमीचा लढा, आंदोलनात देशातील कोट्यावधी रामभक्तांचे योगदान मोलाचे राहिले आहे. नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीला 1981 मध्ये कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात हिंदू एकताची शाखा सुरू झाली. अत्यंत कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून तयार होऊ लागले. ज्या काळात जनसंघाचा झालेला भाजप आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोल्हापुरात बाळसे धरलेली नव्हती,त्या त्या काळी हिंदू एकता आंदोलन उग्र संघटन म्हणून आघाडीवर होती. या संघटनेने समान नागरी कायदा आणि राम मंदिराचा अजेंडा घेऊन लढा सुरू केला केला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध जाती पातीचे कार्यकर्ते हिंदू एकताच्या भगव्या झेंड्याखाली आले. कोणत्याही प्रश्नावर हिंदू एकताने दिलेल्या एका हाकेवर कोल्हापूर शहर बंद होत असे, इतकी ताकद शहरात या संघटनेने निर्माण केली. कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते असणाऱ्या हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचीही बारीक नजर होती. राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात मिसा कायद्यान्वये प्रा. विजय कुलकर्णी, रवि घोरपडे, शैलेश पोवार, उदय पोवार आणि लाला गायकवाड यांच्यावर कारवाई झाली. कळंबा जेल, बिंदू चौक सबजेलमध्ये हिंदू एकताचे अनेक कार्यकर्ते शिक्षा भोगून आले. हिंदू एकताच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तरीही हिंदुत्ववाद श्वास असलेल्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली नाही. 1984 च्या दरम्यान, अमेरिकन वकालतीवर बॉम्ब टाकण्यासाठी गेलेल्यामध्ये शैलेश पोवार हा कट्टर कार्यकर्ता हुतात्मा झाला. त्यांच्याबरोबर दिलीप भिवटे आणि श्रीकांत पौंडकर यांच्यासह नाशिकच्या हिंदू एकता, वंदेमारत्म संघटनेचे कार्यकर्ते होते. अमेरिका पाकिस्तानला लष्करी मदत करत असल्याने संतापलेल्या हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईतील अमेरिकन वकालतीवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement

अखंड हिंदुस्थानासाठी १४ ऑगस्टला रात्री मशाल मिरवणूक, हिंदुत्व, महागाई व इतर प्रश्नांवरही शहरात हिंदू एकताची आंदोलने सुरु होती. 1987 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक सिंघल कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासोबत १९८७ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक सिंघल कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासोबत विहिंपचे स्थानिक नेते माधवराव साळुंखे (संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांचे वडील) होते. त्यावेळी सिंघल यांची हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. सिंघल यांनी तुमचा कार्यक्रम काय आहे? असा प्रश्न विचारला तेव्हा हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समान नागरी कायदा, अयोध्येत राम मंदिर आणि अखंड हिंदूस्थानची निर्मिती झाली पाहिजे, असे सांगितले. पुढे राम जन्मभूमीच्या आंदोलनाने वेग घेतला. त्यामध्ये हिंदू एकताचा सहभाग राहिला.

रामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर देशात भाजप आणि राज्यात शिवसेना आणि भाजप यांचे वारे वाहू लागले. या काळात हिंदू एकताची ताकद या पक्षांच्या संघटनेकडे वळली. गेल्या तीन दशकांत ताकद कमी झाली असली तरी हिंदू एकताचे कार्यकर्ते लढत आहेत. त्यांच्यातील नव्वदच्या पिढीतील अनेक जण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जे आहेत, त्यांनी नव्या पिढीकडे संघटनेची सूत्रे सोपविली आहेत.

अभिमान आणि आनंद आणि दिवंगत कार्यकर्त्यांची आठवण

अयोध्येत सोमवार 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे, या सोहळ्याचा आनंद आणि अभिमान असल्याची भावना तरुण भारत संवादशी बोलताना बाबा पार्टे, चंद्रकांत बराले, लालासाहेब गायकवाड, अशोक देसाई, अण्णा पोतदार, किशोर ओतारी यांनी व्यक्त केली. ज्यांनी लढ्यात भाग घेतला आणि आज ते आपल्यात नाही, ते जर आज असते तर त्यांना अतीव आनंद झाला असता, असेही या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

हिंदू एकताची एकेकाळची फौज

प्रा. विजय कुलकर्णी, शैलेश पोवार, शिवाजीराव ससे, सुरेश काकडे, राजू गवळी, उदय पोवार, दीपक मगदूम, दत्ता राऊत, संभाजी खराडे, राजू काशीद, अनिल काशीद, नंदकुमार सुतार (हे सर्व कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.)

हयात असलेले कार्यकर्ते : बाबा पार्टे, लालासाहेब गायकवाड, चंद्रकांत बराले, अशोक देसाई (सध्या भाजपचे नेते), रवि घोरपडे, उदय घोरपडे, हिंदूराव शेळके, आण्णा पोतदार, दिलीप भिवटे, प्रकाश आयरेकर, श्रीकांत पौंडकर, संभाजी शिंदे, अजित चव्हाण, दिलीप सूर्यवंशी, अजित तोडकर, गणेश नारायणकर, सुजित गायकवाड बंधू, बापु वडगावकर, पत्रकार नंदकुमार ओतारी, बबन लगारे, आनंदा कवडे, वैभव कवडे, विद्यमान जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर.

Advertisement
Tags :

.