सॅमसंग, ओप्पो, रियलमीसह अन्य फोनच्या किंमती वाढणार
सदर फोनच्या किंमती 3000 पर्यंत वाढण्याची शक्यता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सॅमसंग, ओप्पो, रियलमी, शाओमी आणि रेडमीचे अनेक स्मार्टफोन महाग होणार आहेत. एका अहवालानुसार, घटकांच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्या त्यांच्या हँडसेटच्या किमतीत 1000 ते 3000 पर्यंत वाढ करणार आहेत. स्मार्टफोन व्यतिरिक्त अन्य काही घटकांचाही यामध्ये समावेश राहणार आहे. प्राप्त अहवालानुसार, एआय डेटा सेंटर्सच्या प्रचंड मागणीमुळे रॅम आणि नँड या सारख्या मेमरी घटकांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे मेमरीचे संकट निर्माण झाले आहे. तथापि, कंपन्यांनी या दरवाढीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
कोणत्या मॉडेल्सच्या किमतीत किती वाढ?
- सॅमसंग : सॅमसंग आपल्या लोकप्रिय ए आणि एफ सीरीजच्या बजेट आणि मिड-रेंज फोनच्या किमती वाढवू शकते.
- ओप्पो : ए सिरीजच्या फोन्सच्या किमती वाढणार आहेत. ओप्पोच्या वाढीत ओप्पो ए6एक्स 5 जी आणि ओप्पो ए6 5 जी या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
- रियलमी : रियलमीच्या अनेक मॉडेल्सच्या किमती वाढत आहेत, मात्र एकूण किती फोन्सवर परिणाम होणार आहे याची नेमकी संख्या अद्याप कळलेली नाही. यामध्ये रियलमी सी83 आणि पी सिरीजच्या डिव्हाइसेसचा समावेश आहे.
- रेडमी आणि शाओमी : फोन्सच्या किमती 2,000 पर्यंत वाढणार, टीव्हीच्या किमतीही वाढणार आहेत.
- नथिंग : या कंपनीचे फोनसुद्धा महागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टपासून नथिंग फोन 4ए ची किंमत वाढणार आहे.
एआय डेटा सेंटरमुळे मेमरीचे गंभीर संकट
जागतिक बाजारपेठेत एआय डेटा सेंटर्सची मागणी प्रचंड वाढल्यामुळे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांवर खर्च वाढवण्याचा दबाव आहे. मर्यादित पुरवठा आणि जास्त मागणीमुळे घटकांच्या किमती गगनाला भिडत आहेत, ज्याचा थेट परिणाम गॅझेटच्या उत्पादन खर्चावर होतो.