मानकुराद आंब्यांचे दर गडगडले
बागायतदार, कंत्राटदार अडचणीत : यंदा राज्यात सर्वत्र आंब्याचे बंपर पीक
पणजी : राज्यात आंब्याचे बंपर पीक आल्यामुळे मानकुरादाचे दर अचानक गडगडले आहेत. राजधानी पणजीत सोमवारी चांगल्या दर्जेदार मानकुरादाचे दर डझनला चारशे रुपये एवढे खाली उतरले होते. यंदा गोव्यात सर्वत्र आंब्याचे बंपर पीक आलेले आहे. बाजारामध्ये आंब्यांची आवक वाढत आहे. यंदा शेजारच्या राज्यातून हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यांतून हापूस आंबा गोव्यात विक्रीसाठी यायचा. परंतु यंदा कोकणामध्ये फारच कमी प्रमाणात हापूस आंबा लागलेला आहे. त्यामुळे हा आंबा गोव्यातील बाजारपेठांमध्ये फारसा दिसला नाही.
गोवा हापूसला कमी दर
गोव्यात अनेकांनी आपल्या बागायतींमध्ये किंवा घरांसमोर हापूसचे कलम लावलेले आहे. त्याला गोवा हापूस असेही म्हणतात. त्या आंब्याची विक्री चालू आहे. मात्र त्याला फारसा दर गोव्यात मिळत नाही.
मानकुरादलाच सर्वाधिक पसंती
गोव्यातील नागरिक मानकुरादला पहिली पसंत देतात. त्यानंतर मांगीलाल या आंब्याला प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर गोव्यातील अन्य स्थानिक आंब्यांना आपली पसंती देत असतात. महाराष्ट्रातून काही नागरिक गोव्यात स्थायिक झालेले आहेत, ते हापूसला पहिली पसंती देत असतात. यंदा शेजारील राज्यांतून अद्याप आंबा आलेला नाही. गोव्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याचे पीक वाढलेले आहे, त्यामुळे मानकुरादाचे दर देखील गडगडले आहेत.
आंबा कंत्राटदार अडचणीत
वास्तविक दरवर्षी मे च्या दुसऱ्या आठवड्यात मानकुरादाचे पीक वाढलेले असते. आवकही वाढल्यामुळे दर थोडे कमी होतात, मात्र यंदा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यातच मानकुरादचे दर घसरले आहेत. परिणामी ज्या मंडळींनी बागायतदारकडून आंब्याचे झाड ठेक्यावर घेतले होते ती मंडळी तथा कंत्राटदार फारच अडचणीत आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी 1500 रुपये प्रति डझन एवढा आंब्याचा दर होता आणि सोमवारी तो चारशे ऊपये प्रति डझन एवढा खाली उतरला.
पहिल्यांदाच मानकुराद स्वस्त
सध्या सुरु असलेल्या आठवड्यात आणि पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात बाजारात मानकुराद आंबा येणार असल्यामुळे दर आणखी खाली उतरणार, असा अंदाज आहे. पणजी बाजारात आंबा विक्रेते, ग्राहकांना फार कमी दरात आंबे विकू लागले आहेत. ही पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहायला मिळाली. प्रत्यक्षात बागायतदार आणि ज्यांनी आंब्याचे कंत्राट घेतलेले आहे, ते यंदा फार अडचणीत आले आहेत. आंब्याच्या झाडावर चढण्यासाठी कामगार एका दिवसाला किमान रुपये 2000 मागतो आणि आंबा बागायतदाराला देखील वेगळे पैसे दिले पाहिजेत. एवढं करून झाल्यानंतर आंब्याचे दर गडगडले. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आलेले आहेत.