एसी-फ्रिजसारख्या उपकरणांची किंमत वाढणार
बीईईचे नवीन स्टार रेटिंग लागू : डॉलर आणि तांब्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नव्या वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यात फ्रिज, एसी यांचा समावेश असेल.नवीन वर्षात रेफ्रिजरेटर (फ्रिज) आणि एअर कंडिशनर (एसी) सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे महाग होऊ शकतात, कारण ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) चे नवीन स्टार रेटिंग नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होत आहेत. यामुळे, रूम एअर कंडिशनरची किंमत 10 टक्के आणि रेफ्रिजरेटरची किंमत 5टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अधिक आहे. नवीन रेटिंगनुसार यंत्रसामग्रीमध्ये बदल आणि महागड्या घटकांचा वापर यामुळे ही वाढ आवश्यक असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. यासोबतच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कमकुवतपणा आणि जागतिक बाजारात तांब्याच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादकांवर उत्पादन खर्चावर दबाव पडताना दिसतो आहे.
5-स्टार एसीला आता 4-स्टार म्हणणार
नवीन बीईई नियमांनुसार, ऊर्जा कार्यक्षमतेचे मानक अधिक कठोर झाले आहेत. ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन म्हणाले की, नवीन नियम लागू झाल्यानंतर आजचा 5-स्टार एसी उद्या 4-स्टार होईल. त्याचप्रमाणे, सध्याचा 4-स्टार एसी 3-स्टार आणि 3-स्टार एसी 2-स्टार रेटिंग दिले जाईल.
टीव्ही, गॅस स्टोव्हवर रेटिंग अनिवार्य
बीईईने केवळ एसी आणि फ्रिजसाठीच नव्हे तर इतर अनेक घरगुती उपकरणांसाठी देखील स्टार लेबलिंग अनिवार्य केले आहे.
इनपुट खर्च आणि डॉलरवर वाढता दबाव
गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी म्हणाले की, सध्या ग्राहकोपयोगी वस्तू उद्योग दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे रुपयाचे घसरते मूल्य आणि तांब्यासारख्या वस्तूंच्या वाढत्या किमती आहेत, तर दुसरीकडे ऊर्जा रेटिंगमध्ये बदल आहे. या सर्वांचा विचार केल्यास, एसीच्या किमतीत 5-7टक्के आणि रेफ्रिजरेटरमध्ये 3-5 टक्के वाढ लगेच दिसून येऊ शकते.