किया इंडियाकडून किंमत वाढीची घोषणा
वृत्तसंस्था/ चेन्नई
वाहन निर्माती कंपनी किया इंडिया यांनी 1 एप्रिलपासून आपल्या कारच्या किंमती 3 टक्के इतक्या वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इच्छुक कंपनीची कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर 1 एप्रिलनंतर ताण वाढणार आहे.
उत्पादन खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे कंपनीला वाहनांच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याचे कारण कंपनीने सांगितले आहे.
कंपनीने यावर्षी पहिल्यांदाच वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. किया इंडियाचे भारताचे प्रमुख (विक्री आणि विपणन विभाग) हरदीप सिंग बराड यांनी सांगितले की, कंपनी ग्राहकांना प्रीमीयम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशा वाहनांची श्रेणी सादर करते. आगामी काळातही नवनवीन कार्सच्या मॉडेल सादरीकरणावर कंपनीचा भर असेल.
काय आहे कारण
मात्र अलीकडच्या काळामध्ये उत्पादन खर्चामध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचप्रमाणे विनीमय दरातही प्रतिकुलता असल्याने वाहनांच्या किंमती वाढविणे गरजेचे ठरते आहे. असा निर्णय घेताना कंपनीलाही जड जात असल्याचे सांगितले जात आहे. सेल्टॉस, सोनेट आणि कॅरेन्स या वाहनांचे सादरीकरण कंपनी करते. आतापर्यंत भारतात आणि विदेशांमध्ये मिळून 11.6 लाख वाहनांची विक्री कंपनीने केली आहे.