‘एनएसई’कडून आयपीओसाठी प्राईस बँड निश्चित
गुंतवणूकदारांना 17-21 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार : जवळपास 1700 ते 1785 पर्यंत प्राईस बँड निश्चित
वृत्तसंस्था, मुंबई
नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईने आपल्या आयपीओचा प्राईस बँड जाहीर केला आहे. कंपनीने प्रति शेअर 1,700 ते 1,785 इश्यू किमत निश्चित केली आहे. या इश्यूमधून कंपनी सुमारे 22,562 कोटी उभारण्याची योजना आखत आहे.
वरील प्राईस बँडनुसार कंपनीचे एकूण मूल्यांकन 4.42 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे. एनएसईचा इनिशियल पब्लिक ऑफर 17 सप्टेंबर रोजी सबक्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदारांना 21 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार असल्याची माहिती आहे. मोठ्या गुंतवणूकदारांसाठी शेअर्सचे वाटप 16 सप्टेंबर रोजी केले जाईल.
एनएसई शेअर्स 24 रोजी सूचीबद्ध होणार
आयपीओ अंतर्गत शेअर्सचे वाटप 22 सप्टेंबर रोजी होणार असून ज्यांना शेअर्सचे वाटप झाले नाही, त्यांच्यासाठी 23 सप्टेंबर रोजी परतावा (रिफंड) दिला जाणार असल्याची माहिती आहे. त्याच दिवशी, ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप झाले आहे, त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जाणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे शेअर्स 24 सप्टेंबर रोजी बीएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
किरकोळ गुंतवणूकदार रक्कम जमा करू शकतात
या आयपीओसाठी, किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी म्हणजेच 8 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही आयपीओच्या कमाल किंमत बँड 1785 नुसार 1 लॉटसाठी अर्ज केला, तर तुम्हाला 14,280 गुंतवावे लागतील. त्याचवेळी, किरकोळ गुंतवणूकदार आयपीओच्या कमाल 14 लॉट म्हणजेच 112 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. ज्यासाठी गुंतवणूकदारांना कमाल 1,99,920 गुंतवावे लागतील.
कंपनीच्या इश्यूपैकी सुमारे 50 टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि सुमारे 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
सेबीकडून मंजुरी
सेबीने 4 सप्टेंबर रोजी कंपनीच्या डीआरएचपीला मंजुरी दिली होती.
कर आणि खर्च वजा जाता शिल्लक राहिलेली निव्वळ रक्कम, म्हणजेच निव्वळ उत्पन्न, शेअर्स विकणाऱ्या विद्यमान भागधारकांना पूर्णपणे वितरित केले जाईल. या आयपीओचा मुख्य उद्देश केवळ लिस्टिंग आणि ओएफएस (ऑफर फॉर सेल) सुलभ करणे हा आहे. जून 2026 मध्ये दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या तुलनेत कंपनीने इश्यूचा आकार सुमारे 15 टक्केने कमी केला आहे. बाजार नियामक सेबीने 4 सप्टेंबर 2026 रोजी या डीआरएचपीला मंजुरी दिली.
10 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या आरएचपीनुसार, एसबीआय, एमएस स्ट्रॅटेजिक, बँक ऑफ बडोदा, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी विक्री होणाऱ्या शेअर्सची संख्या कमी केली आहे. त्याच वेळी, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, अरंडा इन्व्हेस्टमेंट्स, न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांच्या शेअर विक्री प्रस्तावात कोणताही बदल झालेला नसल्याची माहिती आहे.