कळेतील सांडपाणी नदीत जाण्यापासून रोखा
कोल्हापूर :
पन्हाळा तालुक्यातील कळे गावातील बहुतांशी सांडपाणी नाल्याद्वारे थेट कुंभी-धामणी नदीत मिसळत होते. परिणामी परिसरातील दहा गावांमध्ये अतिसार आणि गॅस्ट्रोसदृष्य साथीचे रुग्णांची संख्या वाढली होती. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत संवाद’मध्ये प्रसिद्ध करून सांडपाणी नदीत न सोडता त्याची अन्यत्र विल्हेवाट लावण्याबाबतच्या जनभावना व्यक्त केल्या होत्या. त्याची जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ विभागाकडून गंभीर दखल घेऊन शुक्रवारी या विभागाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी कळे गावास भेट देवून नदीत जाणारे सांडपाणी रोखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कळे ग्रामपंचायतीकडून नाल्यावर ठिकठिकाणी बंधारे घालण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे बहुतांशी सांडपाणी थेट नदीत न मिसळता जमिनीत मुरणार आहे.
काही वर्षांपुर्वी कळे गावातील सांडपाणी सुमारे सहा ते सात ठिकाणाहून बाहेर पडत होते. त्यामुळे ते नदीत जाण्यापूर्वीच जमिनीत मुरत होते. पण गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी जाणाऱ्या मार्गावर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले. परिणामी गावातील बहुतांशी सांडपाणी नाल्यातून थेट कुंभी-धामणी नदीत मिसळत आहे. सध्या कळे-सावर्डे कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी अडवले आहे. अशा परिस्थितीत कळे गावातील सांडपाणी दररोज मोठ्या प्रमाणात नदीत मिसळत असल्यामुळे पाणी दूषित होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, सांगरुळ, मरळी, चिंचवडे, भामटे, कळंबे, आडुर, कोपार्डे आदी गावात अतिसार आणि कॉलरा सदृश आजाराच्या रूग्णांची संख्या वाढली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने पाणी नमुने तपासणी घेतले. तसेच मल्हारपेठसह अन्य गावांमध्ये घरोघरी जाऊन अतिसार, गॅस्ट्रोसदृष्य आजाराचे रूग्ण आहेत काय ? याची पाहणी केली. पण कळेतील सांडपाणी नदी मिसळत असल्याचे दुखणे कायम राहिल्यामुळे पुन्हा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याची गांभिर्याने दखल घेऊन कळे गावात सांडपाणी प्रकल्प तत्काळ राबविण्याच्या सूचना स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा समन्वयक माधुरी परीट यांनी कळे ग्रामपंचायतीस दिल्या. तसेच हा प्रकल्प उभारण्यासाठी किमन अडीच ते तीन गुंठे जागेची उपलब्धता करून द्यावी असेही त्यांनी ग्रामपंचायतीस सूचित केले आहे.
नाल्यावर बंधारे घालण्याचे काम सुरु
दरम्यान सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी किमान सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तुर्तास सांडपाणी नदी मिसळू नये यासाठी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा समन्वयक परीट यांनी कळे ग्रामपंचायतीस दिल्या. त्यानुसार शुक्रवारी ग्रामपंचायतीकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावर ठिकठिकाणी बंधारे घालण्याचे काम सुरु केले आहे. तसेच ‘स्वच्छ भारत मिशन’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाल्याच्या मार्गावर कर्दळीसह आळूची रोपे लावली जाणार आहेत. ज्यामुळे सांडपाण्यातील प्रदुषणाची तिव्रता कमी होणार आहे.
बंधारा ओव्हरफ्लो होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक
घालणाऱ्या बंधाऱ्यावरून सांडपाणी पुन्हा ओव्हरफ्लो होऊ नये याची काळजी घेण्याचे ग्रामपंचायतीस सूचित केले आहे. अनेक बंधारे घालून पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. तसेच ज्या ठिकाणी सांडपाणी साचणार आहे, तेथे टीसीएल पावडर टाकून प्रदुषणाची तीव्रता कमी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे पन्हाळा तालुक्यातील अन्य तीन ते चार ग्रामपंचायतींनाही आदेश दिले आहेत.
माधुरी परीट, जिल्हा समन्वयक, स्वच्छ भारत मिशन, जि.प.कोल्हापूर