अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक रोखा
गृहमंत्री जी. परमेश्वर यांची सूचना
कारवार : जिल्ह्याच्या गोवा सीमाभागातून कर्नाटकात होणारी अमली पदार्थांची आणि बेकायदेशीर दारू वाहतूक हाणून पाडण्यासाठी खबरदारी घेण्याची सूचना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली. मंत्री परमेश्वर दोन दिवशीय जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. येथील जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात पोलीस खात्याच्या प्रगतीचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने राज्यातून अमली पदार्थांचे निर्मूलन करण्याचा विडा उचलला आहे. सीमाभागातून राज्यात अमली पदार्थांची वाहतूक होणार नाही यासाठी पोलीस खात्याने सतर्क राहिले पाहिजे.
कारवार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठाण्याच्या व्याप्तीतील शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन अमली पदार्थामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल जागृती निर्माण करावी. एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आढळून आले तर संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. गृहमंत्री पुढे म्हणाले, कारवार जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात रस्ते अपघातात 589 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रस्ते अपघातामुळे 3,899 जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात अधिक तर अपघात राष्ट्रीय हमरस्त्यावर होत आहेत. राष्ट्रीय हमरस्त्यावर निश्चित करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटची तातडीने दुरुस्ती करावी आणि अशा ठिकाणी फलक लावावेत. ही जबाबदारी राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकार आणि पोलीस खात्याने पार पाडावी.
विदेशी नागरिकांची माहिती गोळा करा
जिल्ह्यात वास्तव्य करुन असलेल्या विदेशी नागरिकांची आणि पर्यटकांची माहिती गोळा करण्याच्या सूचना देऊन ते पुढे म्हणाले. जिल्ह्यातील कायदेशीर आणि अनधिकृत होम स्टे संदर्भात माहिती गोळा केली पाहिजे. अनधिकृत होम स्टेवर कारवाई केली पाहिजे. होम स्टेमध्ये वास्तव्य करुन राहणाऱ्यांनी मद्याचा पुरवठा करण्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आलेली आहे की नाही याचा आढावा घ्यावा. यावेळी जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल, पश्चिम विभागाचे डीआयजी अमित सिंग, जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण आदी उपस्थित होते.