For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चक्क वितळलेले अब्राहम लिंकन

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
चक्क वितळलेले अब्राहम लिंकन
Advertisement

जगभरात सध्या असह्या उष्णतेचा प्रकोप झालेला आहे. हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक तापमानाचे, म्हणून ओळखले जावे, असे अनेक शास्त्रज्ञांचेही म्हणणे आहे. या वर्षात आतापर्यंत उष्माघाताचा त्रास सर्वाधिक लोकांना झाला आहे. काही भागांमध्ये तर तापमान एव्हढे वाढले आहे की केवळ सजीवांनाच नव्हे, तर निर्जीव वस्तूनांही या तापमानाचा त्रास जाणवू लागला आहे. अशीच एक लक्षवेधी घटना अमेरिकेत घडली असून ती चर्चेचा विषय बनली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे गाजलेले अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा 6 फूट उंचीचा आणि आसनावर बसलेल्या स्थितीतील एक पुतळा आहे. या स्थानाला ‘लिंकन मेमोरियल’ म्हणून ओळखले जाते. हा पुतळा मेणापासून बनविलेला आहे.

Advertisement

यंदाच्या उष्णतेच्या लाटेत हा पुतळा चक्क वितळल्याचे दिसून आले. आसनावर बसल्या बसल्याचे लिंकन यांनी मान टाकली आणि त्यांचे हातपायही वितळू लागले. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पुतळा मेणाचा असल्याने त्याची त्वरीत डागडुजी करणे शक्य नव्हते. कारण ती डागडुजी मेणानेच करावी लागणार होती आणि ते मेण पुन्हा वितळण्याचा धोका होता. दुसरीकडे, ‘वितळलेले’ अब्राहम लिंकन विद्रूप दिसू लागल्याने हा पुतळा पाहण्यासाठी येणाऱ्यांचीही नाराजी प्रशासनाला झेलावी लागत होती. मात्र, नंतर काही दिवसांनी उष्णतेची लाट ओसरल्यानंतर पुतळा पूर्वस्थितीत आणण्यात आला. मात्र, हा पुतळा वितळण्याचा हा प्रथम प्रसंग नाही. गेल्या पाच दशकांमध्ये असा प्रकार यापूर्वी किमान दोनदा घडला आहे, अशीही माहिती देण्यात आली. तथापि, यंदा पुतळा वितळलेल्या स्थितीत अधिक काळ राहिला. यावरुन उष्णतेचे संकट किती तीव्र होत आहे, याची जाणीव जगाला झाली. यावर काही ना काही प्रभावी उपाय केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात राहणे अशक्य होईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.