For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

05:01 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
Advertisement

राजस्थानात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आता प्रचाराच्या अंतिम काळात आपले सर्व सामर्थ्य पणाला लावल्याचे दिसून येत आहे. पूर्व राजस्थानात दोन्ही पक्षांमध्ये विशेष चुरस असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. या भागावर या निवडणुकीचे परिणाम प्रामुख्याने अवलंबून राहणार असल्याने येथे निर्णायक स्पर्धा होत आहे, असे तज्ञांकडून मानले जात आहे.

Advertisement

या भागात विधानसभेच्या 200 पैकी 39 जागा आहेत. मागच्या 2018 च्या निवडणुकीत भाजपला येथे केवळ 2 जागा मिळाल्याने पक्षाचा मोठा पराभव झाला होता. काँग्रेसला 25 तर उरलेल्या जागा बसप आणि अपक्षांना मिळाल्या होत्या. या भागात अलवर, भरतपूर, धौलपूर, करौली, दौसा, सवाई माधोपूर आणि राजधानी जयपूरचा काही भाग असे जिल्हे येतात. पूर्वापारपासून येथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच लढत होत असल्याचे दिसते.

अनुसूचित जमाती, मागसवर्गियांचे वर्चस्व

Advertisement

या भागात प्रामुख्याने अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गियांचे प्राबल्य आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी त्या त्या समाजातील नेत्यांना प्रमुखत्वाने उमेदवारी दिली आहे. हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तथापि, 1980 पासून येथे भारतीय जनता पक्षाने चागंल्यापैकी पाय रोवले असून त्यानंतरच्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मागे टाकण्यात यश मिळविले आहे. सध्या काँग्रेसचे सहा मंत्री येथे रिंगणात असून भाजपनेही बलदंड उमेदवार दिले आहेत.

केवळ दोनच जागा

भरतपूर आणि अलवर जिल्ह्यांमध्ये भाजपचा मागच्यावेळी धुव्वा उडाला होता. धौलपूर मतदारसंघात शोभारानी कुशवाह आणि अलवर जिल्ह्यातील मुंडावर मतदारसंघातून मंजीत चौधरी हे दोनच उमेदवार जिंकले होते. शोभारानी कुशवाह या यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. मात्र, यावेळी मागच्या इतके अनुकूल वातावरण काँग्रेससाठी राहिलेले नाही, असे अनेक जाणकारांचे मत आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद न दिल्याने दौसा, अलवर आणि धौलपूर भागात या पक्षाविरोधात नाराजीची असल्याचे बोलले जाते.

भाजपने लावली शक्ती पणाला

गेल्यावेळच्या दारुण पराभवाचे उट्टे काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक जनसभा या भागात आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवार निवडताना भाजपने जात आणि धर्माची समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही या भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत याच भागाने काँग्रेसला जोरदार समर्थन दिल्याने पक्षाला निसटते बहुमत मिळाले होते, याची जाणीव काँग्रेसला आहे. त्यामुळे यंदा दोन्ही पक्षांनी हा भाग प्रतिष्ठेचा केला आहे.

Advertisement
Tags :

.