टाटा समुहातील कंपन्यांच्या समभागावर दबाव
एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीचा परिणाम: समभाग 8 टक्क्यांपर्यंत घसरले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांना पुन्हा पुढील 5 वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा गुरुवारी केली. त्याचे पडसाद शुक्रवारी शेअरबाजारातील टाटा समूहातील कंपन्यांवर दिसून आले. या कंपन्यांच्या समभागात दबाव येऊन ते जवळपास 8 टक्क्यांपर्यंत घसरले होते.
एक लक्षात घ्या की, गुरुवारच्या सत्रात टाटा समूहाचे समभाग हे तेजीत होते. पण गुरुवारी दुपारनंतर चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीची घोषणा समोर आली. या निवडीनंतर शुक्रवारी समभागांमध्ये दबाव दिसून आला. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा वाद सध्या सुरु आहे. बैठकीत चंद्रशेखरन यांची पुर्ननियुक्ती व कंपनीला सुचीबद्ध करण्यास मंजुरी दिली होती. गुरुवारी टाटा केमिकल्स, टाटा इन्वेस्टमेंट, टाटा मोटर्स व टाटा स्टील यांचे समभाग वधारले होते. पण टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समूहाचे नेतृत्व व टाटा सन्सच्या सुचीबद्धतेबाबत चिंता दिसून आली. याचा परिणाम टाटाच्या काही कंपन्यांच्या समभागावर दिसला.
हे समभाग घसरले
टाटा केमिकल्सचा समभाग 8 टक्के इतका घसरला. टाटा मोटर्स पीव्हीचा समभाग 3 टक्के इतका घसरत 304 रुपयांवर इंट्राडे दरम्यान आला होता. टीसीएसचा समभागसुद्धा 3 टक्के इतका घसरणीत होता. तो 2116 रुपयांवर इंट्रा डेदरम्यान आला होता. तर यासोबत टाटा टेक्नॉलॉजीस 2 टक्के, टाटा पॉवर 1 टक्का व टाटा स्टील व टाटा कंझ्युमरचा समभाग अर्धा टक्का इतका घसरणीत होता.