मुख्यमंत्रिपदासाठी खर्गेंवर दबाव
सिद्धरामय्या, शिवकुमारांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी : आमदारांच्या भेटीगाठीमुळे कुतूहलात भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, बेंगळुरात आलेले पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उभय नेत्यांना दिल्लीत वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चर्चा करून निर्णय घेता येईल. बैठकीची तारीख निश्चित करेन तेव्हाच दिल्लीला या, असे सांगून परत पाठविल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंडी डी. के. शिवकुमार यांनी आपापल्या समर्थक आमदारांमार्फत शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड हा मुद्दा हाताळण्यासाठी कोणते सूत्र वापरेल, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
राज्य काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली असून आता उर्वरित कालावधीसाठी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवावे, यासाठी दोन मंत्री व काही आमदारांनी गुरुवारी रात्री दिल्लीला प्रस्थान केले होते. तेथे त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, शिवकुमार समर्थक आमदारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर इकडे बेंगळूरमध्ये सिद्धरामय्या यांनी समर्थक मंत्री व आमदारांमार्फत आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली. शिवकुमार यांच्या रणनीतीला प्रत्युत्तरदाखल सिद्धरामय्यांनीही प्रतितंत्र आखले आहे.
सिद्धरामय्या, शिवकुमारांकडून खर्गेंवर दबाव
शिवकुमार यांनी शुक्रवारी रात्रीच मल्लिकार्जुन खर्गे यांची सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्रिपद वाटप सूत्राची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला. त्यांच्यासोबत माजी खासदार, डी. के. सुरेश व इतर आमदारांनीही खर्गेंची भेट घेऊन अधिकार हस्तांतरातील गोंधळ दूर करण्याची विनंती केली. तर शनिवारी रात्री सिद्धरामय्यांनी यांनी खर्गेंची भेट घेतली. उभयतांमध्ये दीड तास चर्चा झाली. शिवकुमारांच्या गटातील आमदारांमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. पक्षात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी भूमिका स्पष्ट करा, अशी विनंती केल्याचे समजते. भेटीवेळी खर्गेंनी सिद्धरामय्या व शिवकुमार यांना मी यावर निर्णय घेऊ शकत नाही. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेता येईल. बैठकीची तारीख निश्चित करेन तेव्हा दिल्लीला या, असे सांगून परत पाठविले. त्यामुळे रविवारी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
आमदारांकडूनही भेटीगाठी
आमदार सी. पी. योगेश्वर, तन्वीर सेठ, कोळीवाड, यासीर पठाण, श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य दिनेश गुळीगौडा, काँग्रेस नेते शिवरामेगौडा, आनंद ग•देवरमठ यांनी शुक्रवारी रात्रीच शिवकुमार यांची भेट घेतली. तर शनिवारी सकाळी योगेश्वर, कोळीवाड, यासीर पठाण, श्रीनिवास माने यांनी तसेच दुपारी रिझवान अर्शद, विजयानंद काशप्पनवर, अजय सिंग, यशवंतरायगौडा पाटील, मंत्री के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेतली.
हायकमांडसाठी डोकेदुखीचा विषय
पक्ष आणि सरकारच्या हितासाठी अधिकार हस्तांतरावरून पक्षात निर्माण झालेला गोंधळ दूर करणे हायकमांडला अनिवार्य आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या गटातील आमदारांकडून उघडपणे वक्तव्ये देखील होत आहेत. दोन्ही नेते आमदारांची मोट बांधून आपले पारडे जड बनविण्यासाठी कसरत करत आहेत. अशा परिस्थितीत कोणाची बाजू घ्यायची हा निर्णय हायकमांडसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. सिद्धरामय्या व शिवकुमार या दोघांनाही मान्य असेल असा फॉर्म्युला तयार करण्याचे आव्हान काँग्रेसश्रेष्ठींसमोर आहे.
शिवकुमारांकडून देवाचा धावा?
मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या डी. के. शिवकुमार यांनी आता देवाचा धावा सुरू केला आहे. त्यांनी बेंगळूरमधील निवासस्थानी जेनुकल सिद्धेश्वर स्वामी यांच्या पादुकांची विशेष पूजा केली. हासन जिल्ह्यातील अरसीकेरे तालुक्यातील ऐतिहासिक जेनुकल सिद्धेश्वरस्वामी पादुकांची शिवकुमार यांनी सपत्नीक पूजा केली.
‘नंबर गेम’साठी धडपड
मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेली स्पर्धा आत शिगेला पोहोचली आहे. सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी संख्याबळाचा खेळ सुरू केला आहे. कोणाला किती आमदारांचे समर्थन आहे, याची यादी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सादर करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवकुमार यांच्या समर्थनासाठी दिल्लीला गेलेले आमदार शनिवारी दुपारी बेंगळूरला परतले. आपल्या समर्थक आमदारांची यादी शिवकुमार यांनी तयार ठेवली आहे. तर सिद्धरामय्या हे आपल्या समर्थक आमदारांची यादी तयार करत आहेत.
गळ टाकून मासे पकडण्याचे कौशल्य मला अवगत : शिवकुमार
बेंगळूरच्या हेब्बाळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय आवारात शनिवारी जागतिक मत्स्योद्योग दिन कार्यक्रम व मस्त्य मेळ्यात सिद्धरामय्या व शिवकुमार सहभागी झाले होते. सिद्धरामय्या व्यासपीठावर असतानाच शिवकुमार यांनी भाषण करताना, शेतकरी जमिनीवर शेती करतात, तर मच्छीमार पाण्यात शेती करतात. मी लहान अहताना नदीच्या संगमावर जाऊन मासे पकडत होतो. गळ टाकून मासे पकडण्याचे कौशल्य मला अवगत आहे. त्यासाठी खूप संयम लागतो, असे मार्मिकपणे सांगितले. मात्र, शिवकुमार यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.