For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जातोय !

07:10 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जातोय
Advertisement

हरीष साळवे यांच्यासह 600 विधीज्ञांचे सरन्यायाधीशांना पत्र

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

एका विशिष्ट गटाकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. या गटातील लोक न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांची ‘निवडक’ आणि पक्षपाती पद्धतीने प्रशंसा करतात किंवा त्याच पद्धतीने निर्णयांवर टीका करतात. हे चिंताजनक असून असे प्रकार होत राहणे हे अनुचित ठरणार आहे, असा आरोप देशभरातील 600 नामवंत विधीज्ञांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक सविस्तर पत्र भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पाठविले आहे. सुप्रसिद्ध विधीज्ञ हरिष साळवे यांचीही या पत्रावर स्वाक्षरी असल्याने हे पत्र चर्चेचा विषय बनले आहे. या पत्रावर मननकुमार मिश्रा, आदीश अगरवाला, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होल्ला, स्वरुपमा चतुर्वेदी इत्यादी प्रसिद्ध विधीज्ञ आणि वकीलांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. काही विशिष्ट विचारसरणीच्या आणि विशिष्ट हितसंबंधांची जोपासना करणाऱ्या गटाकडून न्यायव्यवस्थेच्या दृढतेवर तसेच एकात्मतेवर आघात करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हा गट विशिष्ट पद्धतीचे निर्णय न्यायाधीशांनी द्यावेत, यासाठी दबावतंत्राचा उपयोग करीत आहे. विशेषत: राजकीय व्यक्तींशी संबंधित प्रकरणे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असणारी प्रकरणे, यांच्या संदर्भात असे दबावतंत्र अधिक प्रमाणात उपयोगात आणलेल्या जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला असून न्यायव्यवस्थेवरच्या विश्वासालाही तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे अनेक गंभीर मुद्दे या विधीज्ञांनी या पत्रात विस्ताराने मांडले आहेत.

Advertisement

लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न

सर्वसामान्य लोकांना भ्रमित करण्यासाठी काही वर्षांपूर्वीची न्यायव्यवस्था आणि सध्याची न्यायव्यवस्था यांची अप्रासंगिक आणि पक्षपाती पद्धतीने तुलना केली जात आहे. त्यावेळी न्यायव्यवस्थेचे ‘सुवर्णयुग’ कसे होते आणि आता न्यायव्यवस्थेचे अवमूल्यन कसे होत आहे, अशा प्रकारचे कथानक सातत्याने प्रसारित केले जात आहे. सध्याच्या न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडेल, अशी व्यवस्था करण्यात हा गट गुंतला आहे, असे काही उदाहरणे देऊन पत्रात स्पष्ट केले गेले आहे.

न्यायाधीशांवर थेट टिप्पण्या

विशिष्ट हितसंबंधांशी लागेबांधे असणाऱ्या या गटाकडून ‘बेंच फिक्सिंग’ तसेच अन्य अवमानजनक शब्दप्रयोग काही निर्णयांच्या संदर्भात केले जात आहेत. तसेच न्यायाधीशांवर थेट टिप्पण्या केल्या जात आहेत. आपल्या देशातील न्यायालये आणि हुकुमशाही पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या देशांमधील न्यायालये यांची हेतुपुरस्सर तुलना करुन आपल्या देशातील न्यायव्यवस्था कशी दुबळी आहे, हे लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन पत्रात आहे.

नियुक्त्यांवरही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

विशिष्ट न्यायाधीशांसंबंधी बनावट आणि धादांत खोटी माहिती प्रसारित करुन अशा न्यायाधीशांची पदोन्नती होऊ न देणे, न्यायाधीशांच्या नियुक्त्या अपप्रचाराच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे, आपल्याला प्रिय असणारी विचारसरणी मानणाऱ्यांची नियुक्ती न्यायाधीश म्हणून होण्यासाठी लबाडीचा मार्गांचा उपयोग करणे, विशिष्ट व्यक्तींवर राजकीय राळ उडविणे इत्यादी कुमार्गांचा उपयोग आपले कुहेतू साध्य करण्यासाठी हा गट करीत आहे, असेही आक्षेप पत्रात आहेत.

निवडणुकीची वेळ साधून...

विशिष्ट हेतूने केले जाणारे हे प्रयत्न या गटाकडून निवडणुकीच्या वेळी अधिक प्रमाणात केले जात आहेत. निवडणुकीचा परिणामही यामुळे प्रभावित व्हावा, असा उद्देश या सर्व क्रियाकलापांच्या मागे आहे, असे स्पष्ट दिसून येते. एकंदरित, सर्वसामान्य लोकांच्या मनात विशिष्ठ विचारधारेसंबंधी पूर्वग्रह किंवा दोषयुक्त भावना निर्माण करण्याच्या हालचाली या गटाकडून पद्धतशीरपणे केल्या जात आहेत. यासाठी न्यायव्यवस्थेची अवमानना करण्याचे दु:साहसही हा गट करीत आहे. याची गांभीर्याने नोंद घेतली जाण्याची अपेक्षा पत्रात व्यक्त केली गेली आहे.

मान्यवर विधीज्ञांचे गंभीर आक्षेप

  • न्यायव्यवस्थेवर पक्षपाती टीका करुन समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न
  • न्यायाधीशांच्या प्रामणिकतेवरच शिंतोडे उडविण्याचे धोकादायक कारस्थान
  • विशिष्ट राजकीय नेत्यांविरोधात समाजमन कलुषित करण्याचा यामागे हेतू
Advertisement
Tags :

.