For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दबाव आणि दादागिरी ही काँग्रेसची पुरातन संस्कृती !

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
दबाव आणि दादागिरी ही काँग्रेसची पुरातन संस्कृती
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

‘दबाव आणि दादागिरी’ ही काँग्रेसची पुरातन संस्कृती आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. भारतातील 600 विधीज्ञांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पाठविलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही टीका महत्वाची मानली जात आहे. ‘एक विशिष्ट हितसंबंधी गट न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून या व्यवस्थेला आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करीत आहे’, अशा अर्थाचे प्रतिपादन विधीज्ञांनी पाठविलेल्या या पत्रात करण्यात आले आहे. या पत्राचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या माध्यमावर त्यांची टिप्पणी केली आहे. पाच दशकांपूर्वी काँग्रेसने ‘निष्ठावंत’ न्यायव्यवस्थेची भाषा केली होती. न्यायव्यवस्थेने राजसत्तेच्या सुरात सूर मिसळला पाहिजे, असा या भाषेचा अर्थ होता. हा काँग्रेस संस्कृतीचा स्वभावधर्मच आहे. स्वत:च्या लाभाचे जे असेल ते इतरांकडून करुन घेणे आणि इतरांवर त्यासाठी दबाव आणणे, ही या संस्कृतीची जुन्या काळापासूची वैशिष्ट्यो आहेत. स्वत:चा लाभ हेच या संस्कृतीचे ध्येय असून देशाच्या लाभाशी या संस्कृतीला काहीही देणेघेणे नाही. म्हणूनही आज जनतेने काँग्रेसला झिडकारले आहे. तरीही या संस्कृतीत काहीही परिवर्तन झालेले नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

संदर्भ इंदिरा गांधींचा

Advertisement

भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1970 च्या दशकात ‘निष्ठावंत न्यायव्यवस्थे’ची भाषा केली होती. केवळ अशी भाषा करुन त्या थांबल्या नव्हत्या, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांची ज्येष्ठता डावलून एका न्यायाधीशांचा सरन्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा हाच मार्ग अवलंबिला होता. त्यावेळी त्यांच्या या कृतीला जोरदार विरोध कायदाप्रेमी समाजाने केला होता. विधीज्ञांनी सरन्यायाधीशांना पाठविलेल्या पत्राच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या इतिहासाची आठवण आपल्या संदेशाच्या माध्यमातून करुन दिली आहे.

Advertisement
Tags :

.