For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमधून 6 वर्षांनंतर राष्ट्रपती राजवट हटवली

06:19 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमधून 6 वर्षांनंतर राष्ट्रपती राजवट हटवली
Advertisement

आता नवीन सरकार स्थापनेचा मार्ग झाला मोकळा 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रपती राजवट हटवण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर केंद्रशासित प्रदेशात नवीन मुख्यमंत्री नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी रात्री उशिरा गृह मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली.

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये झाली होती. निवडणुकीनंतर भाजप-पीडीपीने युतीचे सरकार स्थापन केले. 2018 मध्ये भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने आणि मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकार कोसळले. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राजवट होती.

जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) 42 जागा जिंकल्या. तसेच त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसने 6 आणि माकपने एक जागा जिंकली. निकालानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फाऊख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. 11 ऑक्टोबर रोजी ओमर यांनी राजभवनात जाऊन उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. ओमर अब्दुल्ला यांनी गंदरबल आणि बडगाम या दोन जागांवरून निवडणूक जिंकली. आता ते गंदरबलची जागा राखू शकतात. तर बडगामची जागा सोडणार असल्याचे समजते. कुपवाडामधून निवडणूक हरलेले नसीर अस्लम वानी बडगाममधून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

नवीन सरकार नियुक्तीपूर्वी राष्ट्रपती राजवट उठवणे आवश्यक

नवीन सरकार पदभार स्वीकारण्यासाठी विधानसभेच्या कामकाजाशी संबंधित तरतुदी पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. राष्ट्रपती राजवटीत असे होऊ शकत नाही. याशिवाय, निवडून आलेल्या सरकारला शपथ घेण्याची परवानगी देण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची घोषणा रद्द करणे देखील आवश्यक असल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती राजवट हटवली आहे.

नव्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी

जम्मू-काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन होणार आहे. ओमर अब्दुल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते 16 ऑक्टोबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ओमर अब्दुल्ला यांनी 1998 मध्ये लोकसभेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुऊवात केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदांसह अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यांची जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून ही दुसरी इनिंग असेल. याआधी त्यांनी 2009 ते 2014 या काळात मुख्यमंत्रिपद भूषवले होते.

Advertisement
Tags :

.