मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट मागे
गृह मंत्रालयाकडून अधिसूचना : युमनाम खेमचंद नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही वर्णी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, इंफाळ
भारतीय जनता पक्षाचे युमनाम खेमचंद सिंह यांनी बुधवारी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांनी लोकभवनात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मंगळवारी त्यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. युमनाम खेमचंद सिंह यांच्यासह, नेमचा किपगेन आणि लोसी दिखो अशा दोघांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दोघांनाही राज्यपालांनी लोकभवनात शपथ दिली.
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट बुधवारी दुपारी उठवण्यात आल्यामुळे भाजपला सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवट लागू होती. मे 2023 मध्ये भडकलेला हिंसाचार वाढत गेल्यामुळे गेल्यावर्षीपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता बुधवारी मणिपूरमध्ये जवळजवळ एक वर्षापासून सुरू असलेली राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून राज्यातील राष्ट्रपती राजवट तात्काळ हटवण्याची घोषणा केली. त्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी मणिपूरमध्ये सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर सायंकाळ 6 वाजता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राजवट मागे घेण्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. राज्यघटनेच्या कलम 356 च्या कलम (2) अंतर्गत त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रपतींच्या घोषणेत म्हटले आहे. याअंतर्गत, 13 फेब्रुवारी 2025 रोजी जारी केलेली राष्ट्रपती राजवटीची घोषणा 4 फेब्रुवारी 2026 पासून रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यात राजकीय स्थिरता पुनर्संचयित होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
नेतानिवडीवर शिक्कामोर्तब
भाजप विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारच्या बैठकीत युमनाम खेमचंद सिंहयांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांनी राज्यपालांची भेट घेत सरकारस्थापनेचा दावा केल्यानंतर सायंकाळी शपथविधीही पार पडला. आता त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या दिमतीला दोन उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले असून या नव्या सत्तासमीकरणात जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रपती राजवटीनंतर हळूहळू वातावरण स्थिर
13 फेब्रुवारी 2025 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात दीर्घकाळ जातीय हिंसाचार आणि संवैधानिक संकट निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारला हे पाऊल उचलावे लागले. गेल्या वर्षभरापासून राज्यातील प्रशासकीय यंत्रणा राष्ट्रपती राजवटीअंतर्गत राबविण्यात आली. राज्यात केंद्रीय बल तैनात करून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट 12 फेब्रुवारी रोजी संपणार होती. त्याआधीच एनडीएमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र झाले होते.
तीन दिवसांपासून हालचालींना गती
मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचे पद जवळजवळ एक वर्ष रिक्त राहिले. मणिपूरमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचे आमदार सोमवारी दिल्लीत पोहोचले होते. दरम्यान, राष्ट्रपती राजवट संपण्यापूर्वी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांना राज्याचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले. आता युमनाम खेमचंद सिंह यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत युमनाम खेमचंद सिंह यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे त्यांची मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड होण्याचे संकेत मिळाले होते. तसेच कुकी महिला नेत्या नेमचा किपगेन यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते.
युमनाम खेमचंद सिंह यांची ओळख
युमनाम खेमचंद सिंह हे मैतेई समुदायातील नेते आहेत. त्यांनी सिंगजामेई विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. 2022 मध्ये त्यांना बिरेन सिंग सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आता त्यांच्यावर राज्याची धुरा सोपविण्यात आली आहे. राज्यात पुढील वर्षी मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये संतुलन साधणे हे नवीन मुख्यमंत्र्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. या निवडणुकीत भाजपला जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागू नये असे वातावरण राज्यात निर्माण करावे लागेल. तसेच पक्षाला आगामी निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये तळागाळात शांतता प्रस्थापित करायची आहे.