मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
राज्याचे सर्व अधिकार, उत्तरदायित्व आता केंद्राच्या हाती : मुख्यमंत्र्यांच्या पदत्यागानंतर निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेली दोन वर्षे हिंसाचाराने ग्रस्त असणाऱ्या मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी पदत्याग केला होता. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या राज्याच्या राज्यपालांनी तशी सूचना केल्यानंतर आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या राज्याचे सर्व अधिकार आणि उत्तरदायित्व आता केंद्र सरकारच्या हातात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
2023 पासून मणिपूर अशांत आहे. येथील मैतेयी आणि कुकी या समाजांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंसाचार करताना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा उपयोग करण्यात येत होता. काहीवेळा अग्निबाण प्रक्षेपकांचाही उपयोग केला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मणिपूरच्या पूर्वेला म्यानमार देश असून तेथील फुटीरतावाद्यांचे सहकार्य मणिपुरातील फुटीरतावादी संघटनांना मिळते. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला होता.
गृह विभागाकडून सूचना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी नवी दिल्ली येथे केली आहे. राज्यातील राजकीय आणि इतर प्रकारांची अस्थिरता संपविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता केंद्र सरकार सर्व संबंधितांशी बोलून योग्य तो तोडगा काढणार आहे, अशीही माहिती शहा यांनी दिली आहे.
राष्ट्रपतींकडून अधिसूचना
मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिसूचनेद्वारे केली आहे. ही अधिसूचना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या आसपास प्रसिद्ध केली. या निर्णयाची कारणेही त्यांनी आदेशात स्पष्ट केली आहेत. घटनेतील नियमांच्या अनुसार या राज्यात प्रशासन चालविणे अशक्य झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या सूचनांवर विचार करून आणि राज्याच्या समाजाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंसाचाराची पार्श्वभूमी
मणिपूरच्या मैतेयी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या प्रश्नावरून तेथे 2023 मध्ये प्रचंड हिंसाचाराला प्रारंभ झाला होता. राज्यातील वनवासी जमातींचा मैतेयी समाजाला असा दर्जा देण्यास विरोध होता. दोन्ही समाजांमधील शस्त्रसज्ज गट एकमेकांना लक्ष्य करीत होते. मैतेयी समाज हा राज्याच्या मध्यभागी असलेल्या सखल प्रदेशात वास्तव्य करत असून कुकी आणि अन्य जमाती या सखल प्रदेशाच्या भोवती असलेल्या डोंगराळ भागांमध्ये वास्तव्य करीत आहेत. या हिंसाचारात दोन वर्षांमध्ये 200 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मैतेयी समाज हा प्रामुख्याने हिंदू असून कुकी समाज हा बहुतांशी ख्रिश्चन आहे. त्यामुळे या हिंसाचाराला धार्मिक परिमाणही होते.
संबित पात्रा यांना झेड प्लस सुरक्षा...
भारतीय जनता पक्षाचे ओडिशातील खासदार संबित पात्रा हे पक्षाचे ईशान्य भारतातील प्रभारी आहेत. मणिपूरमधील घटनांमुळे आता त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना या भागात फिरावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना काही फुटिरतावादी गटांकडून धमक्याही आल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेत झेड प्लस दर्जाइतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. संबित पात्रा यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून संबित पात्रा मणिपूरमध्येच ठाण मांडून आहेत.