पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांना राष्ट्रपती पदक
प्रतिनिधी/ पणजी
वाहतूक पोलिस उपअधीक्षक सुदेश सदाशिव नार्वेकर यांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. नार्वेकर यांनी पोलिस खात्यातील विविध पदांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून वरिष्ठांकडून शाबासकी प्राप्त केली आहे. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी पदोन्नत्ती दिली आहे.
नार्वेकर यांची 1999मध्ये उपनिरीक्षकपदावर पोलिस खात्यात नियुक्ती झाली होती. त्यांनी आपल्या कामाला आराधना म्हणून स्वीकारले आणि अनेक सनसनाटी प्रकरणे सोडवून गुन्हेगारांच्या मनात वचक निर्माण केला. त्यांनी सर्व पदांवर प्रामाणिकपणे काम केले. त्यांना 18 ऑगस्ट 2006 रोजी निरीक्षकपदावर बढती मिळाली.
त्यांनी आपल्या कामाच्या कौशल्यातून 12 खून, 6-बलात्कार, 5-दरोडे, 19-घरफोडी, 6-एनडीपीएस आणि इतर अनेक गुह्यांचा यशस्वीपणे तपास लावला. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना दोषी ठरवून शिक्षेपर्यंत पोहोचविले आहे. काही सनसनाटी प्रकरणांमध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 19 डिसेंबर 2014 रोजी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. 20 डिसेंबर 2016 रोजी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आणि कर्तव्यातील निष्ठेबद्दल त्यांना डीजीपीचे मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
प्रामाणिक आणि सक्रिय पोलिस अधिकारी अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. आतापर्यंत पोलिस खात्यात 26 वर्षांची स्वच्छ आणि निष्कलंक सेवा बजावली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, तपास करणे, दोषी सिद्ध करणे, उत्कृष्ट आणि गुणवान व्यावसायिक रेकॉर्ड यामधील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सुदेश एस. नार्वेकर यांना प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलिस खात्यातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले असून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.