राष्ट्रपतींचे ऐतिहासिक राफेल उड्डाण
वृत्तसंस्था/ अंबाला
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी एक नवा इतिहास घडविला आहे. त्यांनी भारतीय वायुदलाच्या अंबाला येथील विमानतळावरुन राफेल विमानात बसून उड्डाण केले. त्यामुळे त्या भारतीय वायुदलाच्या दोन भिन्न युद्धविमानातून उड्डाण करणाऱ्या प्रथम राष्ट्रपती बनल्या आहेत. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी ‘सुखोई 30 एमकेआय’ या युद्धविमानातून उड्डाण केले होते. बुधवारी राष्ट्रपतींच्या समवेत पण एका वेगळ्या विमानातून वायुदलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांनीही विमानउड्डाण केले. राफेल विमानातून काही काळ प्रवास केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे अनुभव पत्रकारांना कथन केले. राफेल विमानातील प्रवासाचा अनुभव निव्वळ अविस्मररणीय होता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. राफेल हे युद्ध विमानांच्या तिसऱ्या पिढीतले जगातील एक अत्याधुनिक विमान मानले जाते. भारताने अशी 36 राफेल विमाने फ्रान्सकडून विकत घेतली आहेत.