अमेरिकेत उद्यापासून राष्ट्राध्यक्ष निवडणूक
कमला हॅरिस-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चांगलीच उत्सुकता आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अमेरिकेत मंगळवार, 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कमला हॅरिस यांनी अंतिम टप्प्यात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता केवळ एकच दिवस उरला आहे. 5 नोव्हेंबरपासून देशभरातील सुमारे 24.4 कोटी मतदार नवीन राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करतील. ही मतदान प्रक्रिया सुमारे 20 दिवस चालणार आहे. 25 नोव्हेंबर हा पोस्टाने मतपत्रिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.