कोलंबियात राष्ट्रपतीपद उमेदवारावर गोळीबार
निवडणूक रॅलीला संबोधित करताना हल्ला : आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ बोगोटा
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर गोळीबार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. राजधानी बोगोटा येथे एका रॅलीला संबोधित करत असताना उरीबे यांच्यावर हल्ला करण्यात आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुलेटिनद्वारे जारी केली आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोर आरोपीला तत्काळ अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.
गोळीबाराची ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंकाळनतर घडली. उरीबे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली आहे. कोलंबियामध्ये 2026 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. मिगुएल उरीबे हे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. 39 वर्षीय उरीबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. हल्लेखोराने उरीबे यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या पाठीत गोळी झाडली. हा हल्ला शहरातील फोंटिबोन भागात झाला. उरीबे यांची परिस्थिती पाहता शहरातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.