भारत दौऱ्यावर येणार युक्रेनचे अध्यक्ष
दिल्लीत पंतप्रधान मोदींशी करणार चर्चा : राजदूताने दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. यानुसार झेलेंस्की हे चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भारतातील युक्रेनचे राजदूत ऑलेक्जेंडर पोलिशचुक यांनी सोमवारी दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी माझ्या अध्यक्षांना भारत दौऱ्यासाठी आमंत्रित केले आहे. झेलेंस्की चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारताला भेट देतील. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. झेलेंस्की यांचा दौरा आमचे द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही नेत्यांना जगभरात शांतता निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ देण्याच्या दृष्टीकोनातून एक मोठी संधी प्रदान करणार असल्याचे युक्रेनच्या राजदूताने म्हटले आहे.
भारत दौऱ्यासाठी उत्सुक
युक्रेनच्या राजदूताने यावेळी पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्याचा उल्लेख केला आहे. मोदींचा हा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव अत्यंत छोटा होता. परंतु भारतात दोन्ही नेत्यांकडे चर्चेसाठी पुरेसा वेळ असणार आहे. अध्यक्ष झेलेंस्की हे भारत दौरा करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. झेलेंस्की यांनी यापूर्वीच कधीच भारताला भेट दिलेली नाही. त्यांचा आगामी दौरा दोन्ही देशांसाठी सुविधाजनक वेळेनुसार होणार असल्याचे राजदूताकडून सांगण्यात आले.
मोदींकडून यापूर्वीच युक्रेन दौरा
पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष झेलेंस्की यांच्या निमंत्रणानुसार 23 ऑगस्ट रोजी युक्रेनचा दौरा केला होता. 1992 मध्ये दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध प्रस्थापित झाल्यावर कुठल्याही भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच युक्रेन दौरा होता. दौऱ्याच्या अखेरीस एक संयुक्त वक्तव्य जारी करण्यात आले होते ज्यात पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन सुनिश्चित करण्याकरता सहकार्य व्यक्त केले होते. तसेच दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चेवर सहमत झाले होते.