मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपा!
पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचा संदेश : 21 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन
पणजी : जगातील सर्व देशात विविध क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा चालू असून त्यात मराठी माणसाचा, मराठी भाषेचा समृद्ध वारसा, संस्कृती जपण्याचे काम जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसांनी करावे, असा संदेश आणि कानमंत्र 21 व्या जागतिक मराठी संमेलनातून अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला.राजधानी पणजीतील कला अकादमीत ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर अध्यक्ष या नात्याने डॉ. काकोडकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जगात सर्वत्र मराठी माणसे विखुरलेली असून ती तेथे आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. नेतृत्व गुण हे मराठी माणसाचे वैशिष्ट्या असून अनेक थोर मराठी मंडळींनी देशात विविध क्षेत्रात नेतृत्व दिले. मराठी भाषा, संस्कृती, वारसा यांची जपणूक महाराष्ट्राबाहेर विविध राज्यात, देशात वास्तव्य करणारी मराठी माणसे प्राधान्याने करतात हे आपण पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या लहानपणीचे मध्य प्रदेशातील मराठी प्राथमिक शाळेचे उदाहरण दिले.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच
मराठी संस्कृती जोपासण्यासाठी लहान मुलांची जडणघडण मुळातून करण्याची गरज आहे. मराठी भाषा संपर्कासाठी आवश्यक आहेच परंतु भाषेचे बाळकडू चांगले मिळावे म्हणून बालशिक्षण, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे. नवीन शिक्षण धोरणातील (एनईपी) त्रिभाषा सूत्र हे त्यासाठी महत्त्वाचे आहे, असे काकोडकर यांनी नमूद केले.
उच्च शिक्षणाची सोय मराठीतून करावी
मराठी माणूस अधिक सक्षम, प्रभावशील होण्यासाठी उच्च शिक्षणाची सोय मराठी भाषेतून करण्याची गरज आहे. त्याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि तशी व्यवस्था करावी, अशी सूचना डॉ. काकोडकर यांनी केली. त्यामुळे व्यवसाय, धंदा आणि नोकरी या माध्यमातून ज्ञानाची गंगा वाढत जाईल. लहान शिक्षण संस्थांचे एकत्रिकरण करावे, असेही ते म्हणाले.
आधुनिक सोयी सुविधांचा योग्य वापर करा
सध्या नवीन तंत्रज्ञानाचे युग असून ते आत्मसात करणे आता काळाची गरज बनले आहे. त्यातूनच नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती (ऑनलाईन) उदयास आली आहे. सर्वांच्या हातातील एक खेळणे बनलेला मोबाईल हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. विज्ञान तंत्रज्ञानाने चांगल्या आधुनिक सोयी सुविधा दिल्या असून त्याचा योग्य वापर करणे आणि गैरवापर टाळणे हे तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. हे सर्व करताना पुन्हा मराठी भाषा, संस्कृती राखणेही जबाबदारी आहे. डिजिटल साक्षरतेमधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची सोडवणूक करणेदेखील आता आपल्या हातात आहे. डिजिटल साक्षरता वाढली तरी अंधश्रद्धा आणि त्याचे परिणाम चालूच आहेत, असेही डॉ. काकोडकर यांनी निदर्शनास आणले.
मराठीसाठी गोव्याचे मोठे योगदान : डॉ. प्रमोद सावंत
मराठी भाषा जिवंत असून गोवा राज्याचे मराठीसाठी मोठे योगदान आहे. गोवा राज्यातील विविध कलाकारांनी मराठी गीतसंगीत, रंगभूमी समृद्ध केली आहे. गोवा राज्यात होणाऱ्या या मराठी जागतिक संमेलनातून ती भाषा देशात, जगात अधिक सक्षम होईल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्तवली. आधुनिक तंत्रज्ञानाने मराठी व कोकणी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गोव्यातील बहुतेक कलाकारांनी मराठी भाषा देशभरात - जगभरात पोहोचवून तिची सेवा केल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
नांदीने जिंकली उपस्थितांची मने
डॉ. काकोडकर आणि डॉ. सावंत यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हजेरीत समई प्रज्वलीत करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी गोव्यातील संजीवन संगीत अकादमीतर्फे डॉ. प्रवीण गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सप्तसूर झंकारीत बोले गिरीजेची विणा’ ही नांदी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या गजरात नांदीचे स्वागत केले. प्रा. अनिल सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अनेक मान्यवरांचा सन्मान
डॉ. काकोडकर यांनी डॉ. सावंत यांचा सन्मान केला. तसेच दै. तरुण भारत समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्यासह डॉ. प्रकाश प्रभुदेसाई, डॉ. शिरीष बोरकर, राजेंद्र देसाई आणि अशोक परब यांचा डॉ. काकोडकरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दै. तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील यांचा सन्मान केला. उद्योजक अनिल खंवटे यांना जागतिक मराठी भूषण सन्मान व महेश मांजरेकर यांना कलाजीवन गौरव सन्मान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, अमेरिकेतील मराठी खासदार ठाणेदार आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या शुभेच्छांचे ऑनलाईन स्वरुपातून प्रदर्शन करण्यात आले. कार्याध्यक्ष उदय लाड यांनी आभार प्रदर्शन केले.
आज, उद्या दिवसभर कार्यक्रम
जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा’ हे 21 वे जागतिक मराठी संमेलन रविवार 11 जानेवारीपर्यंत कला अकादमीत रंगणार आहे. त्यात काव्य संमेलन व इतर विषयांवरील चर्चासत्रे, मुलाखती यांचा समावेश आहे. रविवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता समारोप होणार असून यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, रमाकांत खलप, खासदार सदानंद तानावडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.