‘पाताल लोक 2’ चे पोस्टर सादर
जयदीप अहलावतची लोकप्रिय वेबसीरिज ‘पाताल लोक’ लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सस्पेन्सने युक्त अमेझॉन प्राइम व्हिडिओची ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीची ठरली होती. निर्मात्यांनी आता ‘पाताल लोक सीझन 2’ बद्दल माहिती दिली आहे. ‘पाताल लोक’ या सीरिजमध्ये जयदीप अहलावत यांनी पोलीस अधिकारी हाथीराम चौधरीची व्यक्तिरेखा साकारली होती. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाताल लोकच्या दुसऱ्या सीझनचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यात हाथीराम उर्फ जयदीप अहलावतला दाखविण्यात आले आहे. त्याच्या डोळ्यांसमोर एक चाकू असून त्यातून रक्त सांडताना दिसून येते. पाताल लोक सीझन 2 कधी प्रदर्शित होणार हे सांगणे मात्र तूर्तास टाळण्यात आले आहे. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत, अभिषेक बॅनर्जी, नीरज काबी यासारखे कलाकार दिसून आले होते. परंतु सर्वांचे लक्ष हाथीराम चौधरी आणि हथौडा त्यागीमधील लढाईने वेधून घेतले होते.