‘वक्फ’ जेपीसी अहवाल सादरीकरण लांबणीवर
जगदंबिका पाल यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024 वरील जेपीसी अहवाल सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला नाही. अजेंड्यानुसार, भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल हे संजय जयस्वाल यांच्यासोबत अहवाल सादर करणार होते, परंतु हे सादरीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. याबाबत जगदंबिका पाल यांनी पत्रकारांना माहिती दिली. सभापती हा विषय जेव्हा अजेंड्यावर ठेवतील तेव्हा आम्ही वक्फसंबंधी अहवाल सभागृहात मांडू, असे जगदंबिका पाल यांनी सांगितले. पाल यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी असहमती व्यक्त केली आहे. विधेयकावरील समितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जगदंबिका पाल यांनी गेल्या गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत अहवाल सादर केला होता. आता हा अहवाल लवकरचा संसद सभागृहांमध्येही सादर केला जाणार आहे.