For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुती षटकाराच्या तयारीत

06:23 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
महायुती षटकाराच्या तयारीत
Advertisement

माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राज्यसभा निवडणुकीचा मुहूर्त साधत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचा फार मोठा परिणाम आगामी राजकारणावर होणार हे वेगळे सांगायला नको. राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीला किमान एक तरी खासदार निवडून देता येणार का अशी स्थिती झाली आहे. राजकारण इरेला पेटलं आहे आणि जो तो आपलं घोडं दामटतो आहे. ‘मी कुणावर टीका करणार नाही पण मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे’ अशी घोषणा ज्या क्षणी अशोक चव्हाण यांनी केली त्याच क्षणी राज्यसभा निवडणुकीत खेला होणार हे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे तुकडे पडले आहेत. जो गट भाजपा सोबत गेला आहे तो अधिकृत ठरवला गेला आहे व पक्षाचे नाव, झेंडा व चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. शिवसेनेत तर व्हीपचा अधिकार एकनाथ शिंदे गटाचा असा निवाडा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच झाले तर राष्ट्रवादी शरदचंद्र गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची पंचायत होणार आहे. राष्ट्रवादीने कोल्हापूरचे विद्यमान शाहू महाराज यांचे नाव महाआघाडीचे उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. मतदानापर्यंत कोणकोणत्या खेळ्या होतात, कोण कुणाचे हात सोडतो आणि कोण मतदानाला उशीरा पोहोचतो यावर महाराष्ट्रातून कोण राज्यसभा सदस्य होणार हे अवलंबून आहे. पण, भाजपा व महायुती षटकार मारण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारात महाराष्ट्र विधानसभेने निवडलेले सर्वश्री प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री.व्ही. मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. यातील कुणालाही राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळणार नाही असे स्पष्ट संकेत आहेत. नारायण राणे कोकणात लोकसभा मैदानात उतरणार आहेत. भाजपा व महायुतीची सहा नावे लवकरच स्पष्ट होतील. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक पार पडणार व 29 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रासोबत आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, येथेही राज्यसभेची निवडणूक आहे. एकूण 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे व त्यामध्ये महाराष्ट्राच्या सहा जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील आमदार संख्या व निवडून देण्याची खासदार संख्या यांचे गणित लक्षात घेता ज्यांच्या मागे 41 आमदारांची मते तो खासदार होणार हे स्पष्ट आहे. ओघानेच भाजपाच्या षटकार मारणाऱ्या कार्यक्रमात आणि आगे आगे देखो या देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यात काँग्रेसची पुरती वाट लावण्याची मनोकामना दिसते आहे. अशोक चव्हाण दोन वर्षामागे जे रामायण घडले व विधानसभेची दारे बंद झाल्यावर तेथे पोहोचले यामागेही योजना होती हे आता स्पष्ट होते आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, फुटले तेव्हाच सोळा आमदारांना घेऊन फुटणार होते असे सांगत आहेत. काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट अशोक चव्हाण यांच्यासोबत आहे अशी चर्चा आहे. आता निवडणुकीत कोणती खेळी होते एक दोन आमदार असणारे पक्ष, संघटना व अपक्ष काय भूमिका घेतात आणि मतदानातून कोणते चित्र उमटते यावर सर्वांचे लक्ष असेल पण, भाजप व महायुतीने षटकार मारला तर तो इंडिया आघाडी, महाआघाडी व मोदी भाजपा विरोधकांना जिव्हारी लागेल. तूर्त भाजपा व महायुतीला फ्री हीट मिळाली आहे व फडणवीस षटकार मारतात का हा उत्सुकतेचा विषय आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडावी हा खरा चिंतेचा विषय आहे. काँग्रेसचा विचार घेऊन पिढ्यान पिढ्या काम करणारे राजकारणातील महत्त्वाची पदे, सत्ता सातत्याने भोगणारे चव्हाण कुटुंब काँग्रेस का सोडते आहे याचे सखोल चिंतन झाले पाहिजे. काँग्रेसची मातब्बर घराणी म्हणून ज्या घराण्याचा उल्लेख होतो त्यापैकी अनेकांनी काँग्रेस सोडली आहे. काही निष्क्रिय आहेत काही सोडायच्या तयारीत आहेत तर स्वतंत्र चूल मांडणारे शरद पवारांसारखे नेते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करतील अशा शक्यता व्यक्त होत आहेत. काँग्रेस त्यागामागचे  कारण खरे खोटे, रणनिती, प्रभाव की इडी वगैरे ते लवकरच दिसेल. पण, भाजपा अबकी बार चारसो पार या विश्वासाने प्रयत्न करतो आहे. अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा त्याकाळी गाजला होता. तो धाक दाखवून इडीचा बडगा उगारून आता चव्हाण काँग्रेस सोडतील असे वाटत नव्हते. सत्ताधारी पक्ष नेहमीच केंद्रीय यंत्रणांचा सोईचा वापर करतो. काँग्रेसही करत होती. भाजपही करत आहे. आमदार फोडाफोडी, राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी लक्ष्मीदर्शन हे तंत्रही नवे नाही आणि निवडणुका आल्या की आंदोलन हा भागही वेगळा नाही. सारा खेळ झाला आहे. सोईप्रमाणे पटावरची प्यादी हालतात. कुणाच्या तेलाने कुणाची वात लागते आणि सर्व समान म्हणत जाती धर्माच्या मतपेट्या बांधल्या जातात. खोकी आणि कंटेनरची भाषा ऐकू येते हे सारे ओंघळवाणे आहे पण आहे. चारित्र्य व नैतिकता हरवलेल्या पॅकेज जमान्यात याला पर्याय नाही. यावर झाली तर मतपेटीतूनच क्रांती होऊ शकते. महाराष्ट्राला सर्वांगिण विकास, प्रगती स्थैर्य हवे असेल तर कुणा एकाला बळकट बहुमत व सत्ता दिली पाहिजे आणि निवडून दिलेला प्रत्येक आमदार खासदार, चांगला, स्वच्छ व लोककल्याणकारी असेल याची खात्री केली पाहिजे. अन्यथा हा खेळ असाच सुरू राहील. खेळाडू, गडगंज होतील त्याचे बगलबच्चे टोप्या घालून तूप रोटी खाताना दिसतील. आणि सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय यांच्यावर आणि राज्यावर संकटमालिका येतच राहील. पूर्वी महाराष्ट्रात आमदार संख्या बघून नेते राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करत असत. आता तसे होत नाही. या मतदानात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. गेल्या वर्षी या मतदानानंतरच ‘काय झाडी, काय डोंगर’चा प्रयोग व सत्तांतर झाले. आता काय होते ते पहायचे. दरम्यान महायुतीकडून 5 नावांची घोषणा झाली आहे तर काँग्रेस आघाडीकडून एका नावाची घोषणा झाली आहे. वरवर निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात काय होते ते बघावे लागेल. घोडे मैदान लांब नाही पण, अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाण्याने अनेक गणिते बदलली आहेत.  लोकसभेचे मैदान आता फार दूर नाही. पक्षांच्या भूमिका व उमेदवार यांची जवळपास निश्चिती झाली आहे. अशोक चव्हाण फुटल्याने महाआघाडीची बंद खोलीतील चर्चा व निर्णय अडचणीचे ठरू शकतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.