For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संघर्षाची सज्जता, चर्चेतही प्रगती

06:39 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
संघर्षाची सज्जता  चर्चेतही प्रगती
Advertisement

अमेरिका-इराण यांच्यात परस्परविरोधी घडामोडी

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी, तेहरान

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका लवकरच इराणवर इस्रायलच्या साहाय्याने हल्ला करण्याच्या स्थितीत आहे, असे बोलले जात आहे. तथापि, दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चाही होत असून या चर्चेत प्रगती होत आहे, अशीही माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे या दोन देशांमधील संबंध आता एका स्वारस्यपूर्ण वळणावर पोहचले आहेत, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisement

इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने पूर्ण सज्जता केली आहे. इस्रायलचाही अमेरिकेला पाठिंबा आहे. इस्रायल स्वत: अमेरिकेसह इराणवर हल्ला करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्याचवेळी युद्ध टाळण्यासाठी बोलणीही केली जात आहेत. अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका मध्यपूर्वेच्या आखातात आणल्या आहेत. तसेच, इतर युद्धानौका आणि युद्ध विमानेही मोठ्या प्रमाणात आहेत.

चर्चेमध्ये प्रगती

अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चाही केली जात आहे. इराणने आपला अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम थांबवावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. तथापि, इराणने युरेनियम संपृक्तीकरणाचा कार्यक्रम थांबविण्यास नकार दिला असून आम्ही अणस्त्रे निर्माण करू नयेत, असे अमेरिकेला वाटत असेल, तर आमच्यावरचे प्रतिबंध हटविण्यात यावेत, अशी मागणी इराणने केली आहे. त्यासाठी अमेरिकेचा होकार नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चा अडकून पडल्याची परिस्थिती आहे.

चर्चा विफल झाल्यास काय...

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा विफल झाल्यास अमेरिका इराणवर हल्ला करणार काय, यासंबंधी आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला करण्यासाठी जोरादार योजना केली आहे. इस्रायलच्या सहभागाने हा हल्ला लवकरच चढविण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत सध्या युद्धजन्य वातावरण आहे. गेल्या वर्षीही अमेरिकेच्या युद्ध विमानांनी इराणवर हल्ले करून इराणच्या युरेनियम संपृक्त करण्याच्या क्षमतेवर आघात केला होता. तो सशस्त्र संसर्ष 12 दिवस चालला होता. यावेळी मात्र, अमेरिकेने अधिक मोठी सज्जता केली असून इराणमध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या हेतूने हे हल्ले केले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिनेव्हा येथे चर्चा

सध्या जिनेव्हा येथे अमेरिका आणि इराण यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा केली जात आहे. मात्र, या चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता कमीच आहे. इराण आपल्या अणुकार्यक्रमापासून मागे हटण्यास राजी नाही. पण इराणकडे अणुबाँब असणे हे इस्रायलसाठी सर्वाधिक धोक्याचे आहे. त्यामुळे इराणला अणुबाँब बनवू देण्यास अमेरिका, इस्रायल आणि युरोपियन देश राजी नाहीत. अशा स्थितीत सशस्त्र संघर्ष हा एकच पर्याय दिसत आहे. अमेरिका यावेळी आर-पारच्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. चर्चा होत असतानाही अमेरिकेने इराणच्या आखातातील आणि मध्यपूर्वेतील आपल्या युद्धसामर्थ्यात वाढ करण्याची प्रक्रिया सातत्याने चालविली आहे. त्यामुळे चर्चात्मक तोडग्यासाठी ही अखेरची संधी देण्याची अमेरिकेची योजना आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

इराणमधील आंदोलनाची पार्श्वभूमी

काही आठवड्यांपूर्वी इराणमध्ये तेथील जनतेने तेथील कट्टर धार्मिक प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला होता. मात्र, इराणच्या प्रशासनाने आंदोलकांवर गोळ्या चालवून ते चिरडले होते. इराण प्रशासनाच्या कारवाईत सरकारी आकड्यांच्या अनुसार किमान 6 हजार 500 आंदोलकांचा मृत्यू झाला होता. मात्र, मृतांचा खरा आकडा यापेक्षा काही पटींनी अधिक आहे, असा दावा अनेक सामाजिक संघटनांनी केला आहे. सध्याच्या अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाला या घडामोडींची पार्श्वभूमीही आहे.

Advertisement
Tags :

.