For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूजक्लिकप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी

06:14 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
न्यूजक्लिकप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

न्यूजक्लिक या वृत्तपोर्टलचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी दिल्लीच्या न्यायालयाकडे अर्ज करत वेबसाइटचा कथित देशविरोधी अजेंडा आणि विदेशातून प्राप्त निधीप्रकरणी माफीचा साक्षीदार करण्याची अनुमती मागितली आहे. चक्रवर्ती यांनी न्यायालयात धाव घेत यासंबंधी अर्ज केला आहे.

चक्रवर्तीने मागील आठवड्यात विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर अर्ज दाखल करत माफीची मागणी केली होती. माझ्याकडे महत्त्वपूर्ण माहिती असून ती दिल्ली पोलिसांसमोर उघड करण्याची माझी इच्छा असल्याचे त्याने म्हटले होते. न्यूजक्लिकप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत असून न्यायाधीशांनी चक्रवर्तीचा जबाब नोंदविण्यासाठी हे प्रकरण न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पाठविले आहे.

Advertisement

चक्रवर्तीचे वक्तव्य पाहून त्याच्या अर्जाचे न्यायालयात समर्थन करावे की नाही याचा निर्णय तपास यंत्रणा घेणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखने 3 ऑक्टोबर रोजी चक्रवर्ती आणि न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक केली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

न्यूज पोर्टलला देशाविरोधात असंतोष निर्माण करणे आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता असे एफआयआरमध्ये नमूद आहे. पुरकायस्थने 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रेसी अँड सेक्युलरिजमसोबत (पीएडीएस) कट रचला होता असाही आरोप आहे.

एफआयआरमध्ये नाव असलेले संशयित आणि डाटाच्या विश्लेषणानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर 3 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 88 तर अन्य राज्यांमध्ये 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. न्यूजक्लिकची कार्यालये आणि काही पत्रकारांच्या घराची झडती घेण्यात आली आणि सुमारे 300 इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आले. छाप्यांच्या कारवाईनंतर पोलिसांनी 9 महिला पत्रकारांसमवेत 46 जणांची चौकशी केली होती.

Advertisement
Tags :

.