‘माझे घर’ योजनेचा फायदा घेण्यासाठी कागदपत्रे तयार करा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
साखळी : राज्य सरकारने गेल्या विधानसभा अधिवेशनात मंजूर केलेल्या ‘माझे घर’ या कायद्यामुळे 1972 च्या पूर्वीची सर्व बेकायदेशीर घरे नियमित होणार असून हा कायदा गोव्याच्या भावी पिढीला तसेच त्यांच्या घरांना संरक्षण देणारा ऐतिहासिक असाच कायदा आहे. येत्या सप्टेंबर महिन्यानंतर या योजनेचे अर्ज सर्व पंचायती, नगरपालिकांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून लोकांनी आपल्या घरांची आवश्यक कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी येथे केले.
1972 पूर्वी कोमुनिदाद किंवा सरकारी जागेत उभारण्यात आलेल्या घरांची सनद किंवा इतर कागदपत्रे लोकांनी तयार करून ठेवावी. यापुढे पंचायत सचिव व बिडिओ यांना हे अतिरिक्त काम करून लोकांना त्यांच्या घरांची प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया हाती घ्यायची आहे. अनेक लोकांना आपण आपल्या जागेतच बेकायदेशीरपणे घरांचे केलेले विस्तारीकरण कोण मोडणार असा भ्रम असतो परंतु कोणीही या संदर्भात तक्रार केल्यास संपूर्ण घरच जमीनदोस्त करण्याचा आदेश उच्च न्यायालय देते. त्यासाठीच 1972 पूर्वी कोमुनिदाद व सरकारी जागेत बांधलेल्या, तसेच आपल्याच जागेत अवैधरित्या विस्तारीकरण केलेल्या अनियमित घरांना नियमित करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.
साखळी मतदारसंघातील पाळी कोठंबी या पंचायतीच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, पाळीचे सरपंच संतोष नाईक, उपसरपंच निशा नाईक, पंचसदस्य आशा गवळी, गणेश पटवळकर, दीपक नाईक, शिवदास मुळगावकर, प्रशिला गावडे, प्रसाद सावंत, गौरांगी परब, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कदम, बिडीओ ओमकार मांजरेकर व इतरांची उपस्थिती होती.
कोठंबी हा आपला गाव असून पाळी कोठंबी ही आमचीच पंचायत आहे. या पंचायतीत आपण दहावीनंतर निवासी दाखला नेण्यासाठी आलो होतो. त्यावेळी या पंचायतीची आपण पाहिलेली परिस्थिती आजही जैसे थे अशीच होती. अत्यंत जर्जर बनलेली ही पंचायत जागे संदर्भात तांत्रिक अडचण असल्याने नव्याने आपण उभारू शकत नव्हतो, ही आपणास खंत होती. परंतु आज या जागेशी संबंधित सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्याने सुमारे पाच कोटी खर्चून प्रशस्त अशी पंचायत इमारत आहे त्याच ठिकाणी उभारणे शक्य होत आहे. गावातील लोकांनी सरकारतर्फे होऊ घातलेल्या विकासाला जर सकारात्मक सहकार्य केले तर कोणतेही प्रकल्प येण्यास वेळ लागत नाहीत, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी म्हटले.
यावेळी सरपंच संतोष नाईक यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, पाळी कोठंबी पंचायत क्षेत्रातील अनेक कामांना मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत दिलेल्या सहकार्यामुळे या पंचायत क्षेत्रातील बहुतेक कामे पूर्ण झालेली आहेत. केवळ या पंचायत इमारतीचे कामच जागेच्या तांत्रिक विषयामुळे अडकले होते. त्या संदर्भात आपला मोठेपणा बाजूला ठेवून जागेशी संबंधित मालकांशी संपर्क साधण्याचे व त्यांच्याकडून ना हरकत घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या आव्हानानुसार जागा मालकांशी आम्ही चर्चा करून अखेर आज या पंचायत इमारतीचे स्वप्न चालीस लागत आहे, याबाबत समाधान वाटत आहे, असेही ते म्हणाले. सरपंच संतोष नाईक यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ऐश्वर्या नायर यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नवीन पंचायत इमारतीची पायाभरणी करण्यात आली. तसेच समई प्रज्वलित करून व कोनशीला अनावरण करून या प्रकल्पाला प्रारंभ करण्यात आला.