For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टंचाईसदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा

04:35 PM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
टंचाईसदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा
Advertisement

सातारा : 

Advertisement

यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते. याचा विचार करुन तालुकास्तरीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा. टंचाई सदृश्य गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याचा पुरवठा करुन पाणी कमी पडून देऊ नका, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

वाईच्या प्रशासकीय इमारतीमध्ये वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थिती व प्रशासकीय कामकाज आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला वाईचे प्रातांधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्यासह वाई, खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी तसेच आदी कार्यान्वयन यंत्रणाच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

Advertisement

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अभिवादन केले. वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यात तीव्र टंचाई भासणार नाही, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला परंतु महाबळेश्वरला नेहमीपेक्षा कमी झाला. एकूणच उन्हाळ्याच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे येथील तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. उन्हाळच्या तीव्रतेमुळे पाण्याच्या समस्या निर्माण होतात. विहिरीतील पाण्याची पातळी घटते व पाण्याचा उपसाही अधिक होतो. शेतीला अधिकचे पाणी द्यायला लागते. बाष्पीभवनामुळे व इतर वापरामुळे धरणांमधल्या पाण्याची पातळीही खाली जात असते. काही गावे टंचाईमध्ये येण्याची शक्यता असणाऱ्या गावांवर लक्ष ठेवून आणि त्या गावांना लागण्राया उपाययोजना कराव्यात. या गावांची जर टँकरची मागणी असेल तर स्थळ पाहणी करून या गावांना टँकरने पाणी पुरवठा करून इतर उपाययोजना कराव्यात. तसेच पाणी पुरवठा व जल जीवन मिशनची प्रगती पथावर असणारी कामे टंचाईपूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांबरोबर धोम डावा व उजवा कालव्याच्या पाण्याची आवर्तने, जललक्ष्मी, कवठे केंजळ योजनेचा आढावा घेतला. अपूर्ण कामे असलेल्या ठिकाणी कंत्राटदारांची बैठक घेऊन कामे वेळेत पूर्ण करा. गावांमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे.

वाई, पाचगणी, महाबळेश्वर हा पर्यटनाचा भाग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यामुळेयेथील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्युत जनित्रांच्या चोरीबरोबर इतर चोऱ्यांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वारंवार करावे. त्याच बरोबर टंचाईच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत मोबाईल चालू असले पाहिजेत, अशा सूचना यांनी बैठकीत केल्या.

यावेळी 100 दिवस कृती आराखड्यानुसार महसूल विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेऊन लक्ष्मी योजना, गोपीनाथ मुंढे अपघात योजना, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या कातकरी समाजातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे व दाखल्यांचे वाटप मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या क्युआर कोड अॅपचे अनावरणही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या बैठकीला विविध गावाचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.