उड्डाणपुलासाठी नवीन अंदाजपत्रक तयार करा
चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातून जात असलेला बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालयापर्यंतचा उड्डाणपूल मंजूर असल्याने तो पुढे कापसाळपर्यंत नेण्यासाठी स्वतंत्रपणे नव्याने अंदाजपत्रक तयार करा, त्यासाठी घटनास्थळी जाऊन जनतेच्या मागणीनुसार त्यामध्ये बदल करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत महामार्गचे राज्य मुख्य अभियंता संतोष शेलार यांना दिले. त्याचबरोबर गणेशोत्सवापूर्वी दोन दिवसांचा महामार्ग पाहणी दौरा असून त्यामध्ये चिपळुणात थांबून पाहणी करण्याचे आश्वासनही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
शहरात सध्या चर्चेत असलेला महामार्गावरील बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालयापर्यंत मंजूर असलेला उड्डाणपूल पुढे कापसाळपर्यंत होण्यासाठी मंगळवारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार शेखर निकम, महामार्गचे रत्नागिरी, चिपळूणचे अधिकारी आणि शहरातील महायुतीचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार निकम यांनी सांगितले, चिपळूण शहराच्या सीमेतर्गत या महामार्गाचा काही भाग उड्डाणपुलाच्या स्वरुपात पूर्ण झाला असून उर्वरित भाग मात्र जमिनीवरुन जात आहे. परिणामी संपूर्ण शहरात अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा अर्धवट उड्डाणपूल शहरातील घनदाट लोकवस्ती, सामाजिक आणि शासकीय रचना, न्यायालय, शाळा-महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये तसेच अल्पसंख्याक व मागासवर्गीय नागरिकांची रहिवासी वसाहत यांना थेट बाधित करत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणताही सुसज्ज अॅप्रोच रोड किंवा सर्कल उपलब्ध नसल्याने सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने उर्वरित उड्डाण पुलासाठी अंदाजपत्रक तयार केले असून त्याचा खर्च सुमारे ११० कोटी रुपये आहे. या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळावी, अशी मागणी केली. यावर बोलताना मंत्री भोसले म्हणाले, या उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी आपणही सर्वोतोपरी सहकार्य करू, त्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. पुलाचे काम होईपर्यत सध्याच्या कामामुळे ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण व्यापारी महासंघटनाचे अध्यक्ष किशोर रेडीज, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष उदय ओतारी, भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.