मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची पन्हाळगडावर जय्यत तयारी
लघुपट व हिरवे गुरुजीच्या पुतळ्याचे लोकार्पण : संपूर्ण पन्हाळगड निघाला उजाळून
पन्हाळा
नव्या पिढीला शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून देणारा पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद प्रस्तुत पन्हाळगडचा रणसंग्राम पन्हाळ्याहुन छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका या लघुपट व १३ डी थिएटरचा व पैजारवाडी येथे हिरवे गुरुजींच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार ६ मार्च रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी गडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. रात्रीच्या लाईट इफेक्टमुळे तर एक वेगळीच अनुभती मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूरहुन वारणानगर येथे त्यांचे आगमन होणार असुन त्यानंतर ते पैजारवाडी येथे हिरवे गुरुजीच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत. तेथुन पुढे नावली-आपटी-नेबापुर-बुधावरपेठ या बांधारी मार्गे किल्ले पन्हाळा येथे येणार आहेत. १३ डी च्या माध्यामातुन तयार करण्यात आलेल्या लघुपटाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई, खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, विनय कोरे, जयंत आसगावकर, अरुण लाड आदी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान पन्हाळा पर्यटन महोत्सावाची सुरुवात ४ मार्च रोजी झाली आहे. यामध्ये सास्कृतिक कार्यक्रम सुरु झाले आहेत. पन्हाळ्यातील ऐतिहासिक वास्तुसह संपूर्ण तटबंदीला करण्यात आलेली लाईट इफेक्टमुळे एक वेगळे वातावरण तयार झाली असुन इतिहासाची आठवण यामुळे होत आहे.
या सर्व कार्यक्रमासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन यामध्ये 1 पोलीस अधीक्षक, १ अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस अधीक्षक, ४० पोलीस अधिकाऱ्यांसह २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या नमजगेमाळ येथे येणाऱ्या लोकांचे पार्किगची व्यवस्था करण्यात आली असुन त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था खोकड तलाव येथे करण्यात आली आहे.