850 आत्मघाती ड्रोन खरेदी करण्याची तयारी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान दाखविली कमाल : मारक पल्ल्यात इस्लामाबाद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आधुनिक युद्धाचे बदलते स्वरुप पाहता भारतीय सैन्य आता ड्रोनकेंद्रीत युद्धकौशल्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. सैन्य लवकरच स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’चा एक मोठा ताफा सामील करणार असून तो शत्रूच्या ठिकाणांवर सीमापार जात अचूक हल्ला करण्यास सक्षम असणार आहे. या महाप्रकल्पासाठी खर्चाचा प्रारंभिक अनुमान 20 हजार कोटी रुपये इतका व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या या नव्या रणनीतीच्या अंतर्गत 15-20 ‘शक्तिबाण’ रेजिमेंट तयार केल्या जात आहेत.
ही विशेष रेजिमेंट स्वार्म ड्रोन, सुसाइड ड्रोन आणि दीर्घ पल्ल्याच्या युएव्हीने युक्त असेल, ज्याचा मारक पल्ला 5 किलोमीटरपासून 500 किलोमीटरपर्यंत असणार आहे. याचबरोबर प्रत्येक इन्फ्रंट्री बटालियनमध्ये एक ‘अश्नि’ प्लाटून तयार केली जात असून त्याचे काम विशेष स्वरुपात या घातक ड्रोन्सचे संचालन करणे असेल. सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी प्रत्येक सैनिकाला ड्रोन तंत्रज्ञानाने युक्त करण्यासाठी ‘ईगल ऑन एवरी आर्म’ ही संकल्पना मांडली आहे.
जलदगती प्रक्रियेने खरेदी
सैन्याने 850 स्वदेशी कामिकेज ड्रोन्सच्या खरेदीसाठी जलदगती प्रक्रिया अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक प्रक्रियेत दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, तर जलदगतीद्वारे काही महिन्यांमध्ये परीक्षण आणि ऑर्डर पूर्ण करण्यात येणार आहे. ही ऑर्डर दोन सर्वात कमी बोली लावणाऱ्या (एल1 आणि एल2) कंपन्यांदरम्यान 60:40 गुणोत्तरात विभागली जाणार आहे. हे ड्रोन भारी जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपयुक्त भागांमध्येही अचूक निशाणा साधण्यास सक्षम असतील.
स्वदेशी कंपन्यांदरम्यान चढाओढ
मेक इन इंडिया अंतर्गत या प्रकल्पात केवळ भारतीय कंपन्यांच सहभागी होऊ शकणार आहेत. याच्या शर्यतीत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स, अदानी डिफेन्स, सोलर डिफेन्स (नागास्त्र तयार करणारी कंपनी), न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजसोबत नाइब डिफेन्स, ए-व्हिजन आणि एसएमपीपी यासारख्या कंपन्या सामील आहेत.
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळालेला धडा
अलिकडच्या वर्षांमध्ये भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमांमध्ये ड्रोन्सचा प्रभावी वापर केला आहे, यामुळे दहशतवादी तळ नष्ट करण्यास मदत मिळाली आहे. सद्यकाळात सैन्याकडे ‘नागास्त्र-1’ यासारखे स्वदेशी ड्रोन उपलब्ध असून ते इस्रायली आणि पोलिश ड्रोन्सच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आणि अधिक प्रभावी ठरले आहेत. चालू वर्षाला सैन्याने ‘नेटवर्किंग आणि डाटा सेंट्रिसिटीचे वर्ष’ घोषित केले असून यात एआय आधारित युद्धउपकरणांवर जोर देण्यात येणार आहे.