अमृतपालला मुख्यमंत्री करण्याची तयारी
पक्षाने 2027 च्या निवडणुकीसाठी ठरविले दावेदार
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघाचा खासदार अमृतपाल सिंह सध्या आसामच्या तुरुंगात कैद आहे. तर दुसरीकडे पंजाबचा पुढील मुख्यमंत्री म्हणून त्याची दावेदारी जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पंजाब पोलिसांनी 2023 मध्ये अमृतसरच्या बाहेरी क्षेत्रात एका पोलीस स्थानकावर हल्ला केल्याप्रकरणी अमृतपालला अटक करण्यात आली होती.
अकाली दल (वारिस पंजाब दे)ने अमृतपालचे नाव मुख्यमंत्रिपदाचा पुढील दावेदार म्हणून जाहीर केले आहे. पक्षाने तलवंडी साबो येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केलीआहे. फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह खालसाने पक्ष कार्यकर्त्यांना पुढील दीड वर्षापर्यंत अमृतपाल सिंहचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.
2022 मध्ये झालेल्या पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेसला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. पक्षाने 92 जागांवर विजय मिळविला होता, तर काँग्रेसला केवळ 18 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शिरोमणी अकाली दलाला 3 तर भाजपला एक जागा मिळाली होती.
अमृतपाल सिंहच्या सहकाऱ्याला कोठडी
अमृतपालचा निकटवर्तीय पपलप्रीत सिंहला पोलिसांनी अजनालाच्या एका न्यायालयासमोर सादर केले, न्यायालयाने पपलप्रीतला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. पंजाब पोलिसांचे पथक 9 एप्रिल रोजी पपलप्रीतला ताब्यात घेण्यासाठी आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात पोहोचले होते. डिब्रूगढ तुरुंगात एनएसए अंतर्गत त्याची एक वर्षाची कोठडी संपुष्टात आल्यावर त्याला बुधवारी अटक करण्यात आली होती. पपलप्रीतला अजनाला पोलीस स्थानकावर हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेत अमृतसर येथे आणले गेले. पपलप्रीत हा अमृतपालचा सल्लागार म्हणू ओळखला जातो.