शिमला येथील मशिदीचा अवैध भाग पाडण्याची तयारी
शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील संजौली मशिदीचा वाद सोडविण्याची तयारी मशिदीच्या व्यवस्थापनाने दाखविली आहे. या मशिदीचा जो भाग अवैध आहे, तो आम्ही स्वत: पाडविण्यास तयार आहोत, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. या मशिदीच्या विरोधात शिमला येथे हजारो नागरीक रस्त्यावर उतरले असून त्यांनी ही मशीद त्वरित पाडविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मशिदीविरोधात गेला आठवडाभर जोरदार आंदोलने होत असून मंगळवारी पोलिसांची संरक्षण व्यवस्था तोडून आंदोलकांनी मशिदीच्या प्रवेशद्वारापर्यंत मुसंडी मारली होती.
नागरीकांचा हा प्रचंड आणि उत्स्फूर्त क्षोभ दिसल्यानंतर मशिदीच्या व्यवस्थापनाने स्वत:हून कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडला आहे. या मशिदीमुळे राज्यात सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेस पक्षातील मतभेदही चव्हाट्यावर आले होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी ही मशिद त्वरित पाडविली जावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खू यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. संजौली मशीद ही सरकारी जमिनीवर बेकायदा अतिक्रमण करुन बांधली गेली आहे, असा स्थानिक नागरीकांचा आरोप असून या मशिदीच्या आधाराने या भागात बांगला देशी घुसखोर आणि रोहिंग्या यांची संख्या वाढत आहे. यामुळे शिमला शहरात गुन्हेगारी आणि महिलांची छेड काढण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये या मशिदीसंबंधी मोठा क्षोभ निर्माण झाला आहे.