काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग रोखण्याची तयारी
स्थलांतरित कामगारांसाठी क्लस्टर
वृत्तसंस्था, श्रीनगर
काश्मीरच्या कुलगाम येथे 4 दिवसांपूर्वी दोन स्थलांतरित कामगारांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या हत्येनंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने नव्या सुरक्षा रणनीतिवरील चर्चेला वेग दिला आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या सुमारे 4 लाख स्थलांतरित कामगार आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या कामगारांच्या सुरक्षेवरून महत्त्वाची बैठक घेतली असून यात काही निर्देश निश्चित करण्यात आले आहेत.
काश्मीर खोऱ्यात स्थलांतरित कामगार विखुरलेले गेले आहेत, ते असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. या कामगारांना एकाच ठिकाणी राहता यावे म्हणून क्लस्ट निर्माण करण्यात येणार आहे. स्थलांतरित कामगारांना वेगवेगळे राहू दिले जाणार नाही. खोऱ्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या कामगाराला नजीकच्या पोलीस स्थानकात माहिती द्यावी लागणार आहे. हा कामगार ज्या ठिकाणी राहणार, तेथील सुरक्षा पडताळणी पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यानंतरच कामगाराला तेथे राहू दिले जाणार आहे.
बडगाम, दक्षिण काश्मीरवर मुख्य लक्ष
काश्मीर खोऱ्यात शेकडो विटभट्ट्या आहेत, ज्यातील 199 नोंदणीकृत आहेत. बहुतांश मध्य काश्मीरच्या बडगाम आणि दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग, कुलगाम आणि पुलवामा येथे आहेत. पोलिसांनुसार स्थलांतरित कामगारांना वैयक्तिक सुरक्षा पुरविणे व्यवहारिक स्वरुपात शक्य नाही. याचमुळे विटभट्ट्या आणि बागांमध्ये काम करणारे उत्तरप्रदेश, बिहार अन् छत्तीसगडच्या कामगारांना ‘सुरक्षित क्लस्टर्स’मध्ये पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
स्थलांतरितांच्या सुरक्षेचे आव्हान
2019 साली अनुच्छेद 370 हद्दपार झाल्यापासून काश्मीर खोऱ्यात बिगर स्थानिक कामगारांवरील हल्ले वाढले आहेत. संसदीय आकडेवारी अन् गृह मंत्रालयाच्या अधिकृत वक्तव्यांनुसार या 7 वर्षांमध्ये दहशतवाद्यांनी आतापर्यंत सुमारे 23 स्थलांतरितांचे टार्गेट किलिंग केले आहे.