‘कोकण चित्रपट महोत्सव’च्या शुभारंभासाठी रत्नागिरीत सज्जता!
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहोचवण्यासोबत इतरत्र काय सुरू आहे, याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा, यासाठी पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रत्नागिरीत या महोत्सवाचा शुभारंभ होणार असल्याने येथील स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृह नव्या दिमतीने सज्ज झाले आहे.
‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेतर्फे येत्या 9 ते 14 मे या कालावधीत पहिल्या ‘कोकण चित्रपट महोत्सव 2022’चे आयोजन केले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिह्यात हा महोत्सव रंगणार आहे. या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृह रत्नागिरी येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शुभारंभाच्या कार्यक्रमात स्थानिक लोककला व कलावंताचा अविष्कारही पहायला मिळणार आहे.
या महोत्सवासाठी निवड करण्यात आलेले सलग 4 दिवस रोज तीन मराठी चित्रपट येथील प्रेक्षकांना मोफत दाखवले जाणार आहेत. सिंधुरत्न कलावंत मंच व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथे हा महोत्सव साजरा होणार आहे. हा महोत्सव मंत्री उदय सामंत यांच्या मोलाच्या सहकार्याने व पालकमंत्री अनिल परब यांच्या मदतीने आयोजित केला आहे. रत्नागिरीत 9 मे रोजी शुभारंभादिवशी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृहात सायंकाळी 6 वा. चित्रपट-प्रवास, 10 मे रोजी दुपारी 12 वा.ग्न चित्रपट- ‘8 ते 75’, दुपारी 3 वा. ‘पल्याड’, सायंकाळी 6 वा. ‘रिवणावायली’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. 11 मे रोजी दुपारी 12 वा. ‘जीवनसंध्या’, दुपारी 3 वा. ‘मी पण सचिन’, सायं. 6 वा. ‘प्रितम’, 12 वा. दुपारी ‘फनरल’, दुपारी 3 वा. ‘भारत माझा देशा आहे’, सायं. 6 वा. ‘हिरकणी’ हे मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
महोत्सवाचा समारोप सिंधुदुर्गात
या महोत्सवाचा समारोप सिंधुदुर्गात होणार आहे. त्या ठिकाणीही सलग 4 दिवस 14 चित्रपट विनामूल्य दाखवले जाणार आहेत. 12 मे रोजी वेंगुर्ले येथे परिसंवादाचे आयोजन तर 14 मे रोजी या महोत्सवाचा समारोप समारंभ सिंधुदुर्गात मामा वरेरकर नाटय़गृहात सायंकाळी 5 वा. होणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. पहिल्यांदाच होणारा हा कोकण चित्रपट महोत्सव कलासृष्टीला व पर्यटनाला चालना देणार असेल. या महोत्सवासाठी ‘झी टॉकीज’ने पुढाकार घेतल्याचे अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले. रत्नागिरीत महोत्सवाच्या झालेल्या या पत्रकार परिषदेला पाटकर यांच्यासमवेत प्रकाश जाधव, विजय राणे, दत्तात्रय केळकर आदी उपस्थित होते.