राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
देशातील अनेक दिग्गज शरीरसौष्ठवपटूंची उपस्थिती, पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16 वी सिनीयर पुरुष शरीरसौष्ठव व महिला मॉडेल फिजिक स्पर्धा 14 ते 16 जानेवारी रोजी अंगडी कॉलेज मैदान, सावगांव रोड, बेळगाव येथे होणार आल्याची माहिती अविनाश पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल सनमान येथे झालेल्या परिशदेत ते बोलत होते. या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेळगाव, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर व बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने होणार आहेत. ही स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या नियमानुसार होईल. या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या मानद चेअरमनपदी बेळगावचे जिल्हाधारी मोहम्मद रोशन व सहचेअरमनपदी पोलीस आयुक्त येडा मार्टिन मार्बन्यांग हे असतील. या स्पर्धेच्या अध्यक्षपदी रोटे. अविनाश पोतदार, ऑर्गनायजिंग सेक्रेटरी अजित सिद्दन्नावर, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स तसेच बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधार एम., पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
23 वर्षानंतर या स्पर्धा बेळगाव शहरात होत आहेत. 2003 साली बेळगाव शहरात प्रथम ‘मि. इंडिया’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. बेळगाव शहर हे शरीरसौष्ठव क्षेत्रात संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. भारतातील जुन्या शरीरसौष्ठव स्पर्धा एक जुनी बेळगाव श्री स्पर्धा गेली 59 वर्षे सातत्याने घेतली जात आहे. 16 व्या सीनियर पुरुष महिला स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून रेल्वे, पोलीस, सर्विसीस अशा विविध संघातून 500 हून अधिक स्पर्धक व 250 अधिक ऑफिशियल भाग घेणार आहेत. या सर्व स्पर्धकांना तीन दिवस राहणे, नाष्टा, जेवण, स्पर्धा स्थळापासून लॉज पर्यंत नेणे व आणण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने स्टेज साऊंड सिस्टिम लाईट स्वच्छता व्यवस्था आदी महत्त्वाच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याच बराब्sार विजेत्या स्पर्धकांना दिली जाणारी 25 लाखहून अधिक रक्कमेची बक्षिसे सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणार आहेत. याचबरोबर बेळगाव येथील दानशूर क्रीडाप्रेमी, संघ संस्था, उद्योगपती, व्यवसायिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेसाठी बेळगावचे सुपुत्र मि. इंडिया, एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर यांची इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्यावतीने या स्पर्धेसाठी ब्रँड अंबॅसीडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेनिमित्त बेळगावकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठवपटू पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धा क्रीडा प्रेमींना मुक्त प्रवेश दिला जाणार आहे.