For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांच्या सभेची तयारी पूर्ण

11:06 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांच्या सभेची तयारी पूर्ण
Advertisement

सभेला 50 हजार लोकांची उपस्थिती राहणार : मुख्यमंत्र्यांनी घेतले ‘दामबाबा’चे आशीर्वाद,सूत्रनिवेदनाची झाली रंगीत तालीम

Advertisement

मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या सभेला 50 हजार लोकांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली. ही सभा कोणत्याही अडचणीविना यशस्वी व्हावी यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक व नरेंद्र सावईकर यांनी फातोर्डा येथे दामोदर देवस्थानात जाऊन श्रींचे आशीर्वाद घेतले. विकसित भारत या रॅलीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर तीन प्रकल्पांचे उद्घाटन व दोन प्रकल्पांची आभासी पद्धतीने पायाभरणी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्र सरकारच्या दहा वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यातील दहा वर्षांच्या कामगिरीचा आढावा या कार्यक्रमातून घेणार आहे.

या जाहीर सभेचे आयोजन भर दुपारी 1 वाजता करण्यात आल्याने, सभेला उपस्थित राहणाऱ्यांसाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सभेसाठी भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले असून सभेच्या पूर्व संध्येला कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन करणारे गोविंद भगत व डॉ. रूपा च्यारी यांच्या सूत्रनिवेदनाची मुख्यमंत्र्यांनी रंगीत तालीम घेतली. सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांची ठळक माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली. त्याचबरोबर सरकारच्या विविध उपलब्धतेची चित्रफित यावेळी प्रदर्शित केली जाणार आहे. या सभेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, सभेसाठी लोकांची उपस्थिती तसेच खाण्या-पिण्याची व्यवस्था याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, प्रदेश भाजप सरचिटणीस दामू नाईक व नरेंद्र सावईकर हे जातीने लक्ष घालत आहेत.

Advertisement

पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा

दरम्यान, काल संध्याकाळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग (आयपीएस) यांनी मडगाव कदंब बसस्थानकावर भेट देऊन सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोनातून आढावा घेतला. यावेळी पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक इत्यादी उपस्थितीत होते.  सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यासाठी राखीव पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले आहे. पंतप्रधानांचे आगमन ते परतीचा प्रवास याची देखील गेल्या तीन-चार दिवसांपासून रंगीत तालीम सुरू होती. बेतूल येथे ऊर्जा सप्ताह व मडगाव कदंब बसस्थानकावरील जाहीर सभा यामुळे पोलीस यंत्रणेवर बराच ताण आल्याचे दिसून आले.

पंतप्रधान हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास विमानाने दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे बेतूल येथील ओएनजीसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जाणार आहेत. तेथून नंतर मडगाव कदंब बसस्थानकावरील जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे फातोर्डा येथे खुल्या मैदानावर उतरणार आहेत. तेथून ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. हेलिकॉप्टरची रंगीत तालीम दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली. या सभेला भाजपचे सर्व आमदार तसेच मंत्री, भाजपच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आजच्या सभेवेळी वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शिक्षण संचालकांनी मडगाव परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मडगाव परिसरातील उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयाचे वर्ग दुपारी 12 पर्यंत घ्यावे व नंतर विद्यार्थ्यांना सभेच्या ठिकाणी पाठवावे, असे परिपत्रक काल जारी करण्यात आले आहे.

वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता

भव्य स्वरूपाची ही सभा होत असल्याने उद्या मडगाव परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला असला तरी वाहतुकीची कोंडी हीच खरी गंभीर समस्या बनण्याची शक्यता अधिक आहे.

Advertisement
Tags :

.