NEET 2026 | 'नीट' पुनर्परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात; मुंबईहून विमानाने सोलापुरात आल्या प्रश्नपत्रिका!
सोलापूर -रद्द करण्यात आलेल्या नीट पुनर्परीक्षेची तयारी अंतिम टप्यात पोहोचली असून ही परीक्षा रविवार, २१ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोमवारी दुपारी मुंबईहून विमानाद्वारे सोलापुरात आणण्यात आल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्या शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्य शाखेत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव प्रश्नपत्रिकांच्या साठवणुकीबाबत अधिक तपशील देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत आयोजित करण्यात येणारी ही पुनर्परीक्षा रविवार, २१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार आहे. परीक्षार्थीना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी ३ तास १५ मिनिटे, म्हणजेच १९५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. NEET परीक्षा सुरळीत, सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांसाठी सुधारित प्रवेशपत्रे एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षार्थीनी ती डाऊनलोड करून आवश्यक तयारी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.