Kolhapur : महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची तारीख निश्चित
प्रारुप मतदार यादी ६ नोव्हेबर रोजी प्रसिद्ध होणार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी दि. ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
महानगरपालिकेकडून या कामासाठी सर्व सहा. आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी, तर उपशहर अभियंत्यांना सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी विभागनिहाय भाग संबंधित विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आले असून, त्यावर कंट्रोल चार्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्व प्राधिकृत अधिकारी, सहायक प्राधिकृत अधिकारी व पर्यवेक्षकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंट्रोल चार्ट तयार करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली तसेच पर्यवेक्षकांच्या शंका व समस्या दूर करण्यात आल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे व निवडणूक अधीक्षक सुधाकर चलाबाड व पर्यवक्षेक उपस्थित होते. तरी बीएलओ व पर्यवेक्षक हे प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीशी संबंधित काम करणार असल्याने नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.