For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची देशात सज्जता

06:58 AM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आंतरराष्ट्रीय योग दिनाची देशात सज्जता
Advertisement

पंतप्रधान मोदी विशाखापट्टणममध्ये योगसाधना करणार : युनेस्कोच्या स्थळांवरही कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आज, 21 जून रोजी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून देशभरातील 100 प्रसिद्ध स्थळे आणि 50 इतर सांस्कृतिक स्थळांवर योगसत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या स्थळांमध्ये काही युनेस्कोच्या वारसा स्थळांचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशातील विखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागतिक थीम ‘एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग’ अशी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेदेखील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील 100 पर्यटन-केंद्रित स्थळे आणि 50 हून अधिक सांस्कृतिक स्थळांवर योगसत्रांचे आयोजन करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत राजस्थानातील जोधपूर येथील ऐतिहासिक मेहरानगड किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

Advertisement

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये योग सत्रांचे आयोजन केले जाईल ज्यामध्ये चराईदेव मोईदम (आसाम), राणी की वाव आणि धोलावीरा (गुजरात), हंपी आणि पट्टडकल (कर्नाटक), खजुराहो स्मारक समूह आणि सांची स्तूप (मध्य प्रदेश), कोणार्कचे सूर्यमंदिर (ओडिशा), एलिफंटा लेणी (महाराष्ट्र) आणि तंजावरमधील बृहदीश्वर मंदिर (तामिळनाडू) यांचा समावेश आहे.

इतर ठिकाणीही सत्रांचे आयोजन

गोलकोंडा किल्ला आणि सालारजंग संग्रहालय (हैदराबाद), हुमायूनचा मकबरा, पुराण किल्ला आणि सफदरजंग मकबरा (दिल्ली), जालियनवाला बाग (पंजाब), चित्तौडगढ आणि कुंभलगढ किल्ले (राजस्थान), लेह पॅलेस (लडाख), परी महल (श्रीनगर, जम्मू काश्मीर), बेकल किल्ला (केरळ) आणि हजारदुआरी आणि कूचबिहार पॅलेस (पश्चिम बंगाल) यासारख्या काही प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांवरही योगासन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. 21 जून रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत कुतुबमिनार संकुलाच्या प्रतिष्ठित सन डायल लॉन येथे ‘सामूहिक योग सत्र’ आयोजित केले जाईल. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे.

Advertisement
Tags :

.