For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्राम पंचायत निवडणुकांची चाहूल

11:54 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्राम पंचायत निवडणुकांची चाहूल
Advertisement

पंचायत राज सीमांकन आयोगाकडून संख्या जाहीर,  इच्छुकांच्या हालचाली सुरू

Advertisement

बेळगाव : ग्राम पंचायत निवडणुका कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच कर्नाटक पंचायत राज सीमांकन आयोगाने जिल्ह्यातील 497 ग्राम पंचायतींच्या सदस्यांची संख्या जाहीर केली आहे. यावरून ग्राम पंचायत निवडणुकांसाठी ग्रामीण भागात पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या सदस्यांची संख्या लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 497 ग्राम पंचायतींमधील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर सीमांकन आयोगाने विविध ग्राम पंचायतींच्या सदस्यांची संख्या 8 हजार 413 निश्चित करणारा मसुदा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

त्यामुळे सरकार जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींच्या निवडणुकांसोबतच ग्राम पंचायतींच्या निवडणुका घेणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राजकारणात पहिले पाऊल टाकण्यासाठी अनेक हवसे, गवसे व नवसे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. डिसेंबर महिन्यातच ग्राम पंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. राजकीय पक्षाबरोबरच म. ए. समिती व अपक्ष उमेदवार वेगवेगळ्या पातळीवर मतदारांच्या गाठीभेटी घेणे आदी कामात गुंतले आहेत. सदस्यांची संख्या जाहीर करण्यात आली असली तरी सरकारने आरक्षण जाहीर केलेले नाही. ही प्रक्रिया सुरू झाल्यास गावपातळीवरील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.

Advertisement

जिल्ह्यातील 503 ग्राम पंचायतींमधून ग्राम पंचायत निवडणुकीत 8500 हून अधिक सदस्य निवडून आले होते. सध्या जिल्ह्यातील मच्छे, पिरनवाडी, हिंडलगा, हिरेबागेवाडी आणि बेनकनहळ्ळी या ग्राम पंचायतींचा दर्जा वाढविण्यात आला असून त्यांचा समावेश नगर पंचायतमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची संख्या 497 झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे सदस्यांची संख्याही वाढली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ग्राम पंचायत सदस्यांची संख्या पाहिल्यास बेळगाव तालुक्यात सर्वाधिक सदस्य (931) आहेत. त्याचप्रमाणे अथणी ग्रामीण पंचायतीमध्ये एकूण 56 सदस्य आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून त्याकडे पाहिले जाते. याशिवाय केरुर, मंगसुळी, कुडची ग्रामीण पंचायतींमधील सदस्यांची संख्या 40 पर्यंत वाढविण्यात आली आहे. कित्तूर तालुक्यातील विरापूर, रायबाग तालुक्यातील यबरट्टी या लहान पंचायती असून प्रत्येक 6 सदस्य आहेत.

136 तक्रार अर्ज दाखल

2 मेपर्यंत ग्राम पंचायत सदस्य संख्येवर आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार विविध ग्राम पंचायतींमधील नागरिकांनी ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाकडे 136 हून अधिक तक्रार अर्ज सादर केले. या अर्जांवर अद्याप सुनावणी व्हायची आहे.

Advertisement
Tags :

.