For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये सरकार स्थापनेची तयारी तीव्र

06:15 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये सरकार स्थापनेची तयारी तीव्र
Advertisement

दिल्लीत एनडीएची बैठक; 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट संपणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, इंफाळ

मणिपूरमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया तीव्र झाली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मणिपूरमधील सर्व एनडीए आमदारांना दिल्लीला बोलावले आहे. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपूर्वी सर्व आमदारांना राजधानीत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. दिल्लीतील बैठकीसाठी सर्व आमदार 1 फेब्रुवारी रोजीच मणिपूरहून दिल्लीला रवाना झाले होते. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ 12 फेब्रुवारी रोजी संपत असताना आता राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला दिसत आहे.

Advertisement

राज्य युनिट अध्यक्षांसह 20 हून अधिक मणिपूर भाजप आमदार पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचल्याची माहिती सोमवारी सूत्रांकडून देण्यात आली. मणिपूर भाजप प्रदेशाध्यक्ष अधिराजमय शारदा देवी यांनी इंफाळ विमानतळावर रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ‘रालोआमध्ये समाविष्ट असलेल्या राज्यातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले आहे. आता लवकरच राज्यात लोकांच्या पसंतीचे सरकार स्थापन होईल अशी आम्हाला आशा आणि विश्वास आहे’, असे त्यांनी म्हटले होते. तसेच एनडीएतील सर्व आमदारांना बैठकीसाठी आमंत्रित केले जात असल्याने मला सकारात्मक निकालाची आशा आहे, असे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले.

हिंसाचारानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट

मणिपूरमध्ये मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो लोक विस्थापित झाले आहेत. गेल्यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. सध्याच्या मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 2027 मध्ये संपत आहे, परंतु तो स्थगित करण्यात आला आहे. मणिपूर विधानसभेत 60 पैकी 37 सदस्य भाजपचे आहेत. तसेच एनडीए सहयोगी पक्षांपैकी ‘एनपीपी’चे सहा आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) चे पाच आहेत.

Advertisement
Tags :

.