नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग
पंतप्रधान सुशीला कार्की यांची राजकीय पक्षांसोबत बैठक
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी रविवारी 5 मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसंबंधी सर्व 7 प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. ही बैठक बदललेल्या राजकीय संदर्भात केंद्र आणि प्रांतीय सरकारांदरम्यान संवाद आणि समन्यवाला मजबूत करण्यासाठी बोलाविण्यात आली होती अशी माहिती पंतप्रधान माध्यम-समन्वयक राम बहादुर रावल यांनी दिली आहे.
सुशीला कार्की (73 वर्षे) 12 सप्टेंबर रोजी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदीच्या मुद्द्यावरून युवांच्या नेतृत्वात ‘जेन-जेड’कडून सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या हिंसक निदर्शनानंतर तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पदावरून हटविण्यात आले होते. यानंतर सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली होती.
रविवारी झालेली बैठक निवडणूक तयारींच्या संबंधी पंतप्रधानांकडून विविध संबंधित घटकांसोबत विचारविनिमयानंतर बोलाविण्यात आली होती. पंतप्रधान कार्की या सर्वसहमती निर्माण करण्याच्या उद्देशाने आगामी मार्चमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत तसेच ‘जेन-झेड’ समुहांसोबत देखील बैठका घेत आहेत. यानुसार कार्की यांनी शनिवारी नेपाळी काँग्रेसचे महासचिव गगन थापा आणि विश्वप्रकाश शर्मा यांची भेट घेतली होती आणि राजकीय पक्षांना निवडणुकीच्या संबंधी स्वत:ची स्थिती स्पष्ट करण्यास सांगितले होते.
तर रविवारच्या बैठकीत निवडणुकीसाठी सरकारची तयारी, कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीत सुधार आणि निवडणुकीपूर्वी करण्यात येणाऱ्या विविध अन्य कार्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान कार्की यांना निवडणुकीत भागीदारीसाठी स्वत:च्या पक्षाच्या प्रतिबद्धतेचे आश्वासन दिले. नेपाळी काँग्रेस लवकरच ‘जेन-झेड’ समूह तसेच अन्य राजकीय पक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे पक्षाचे नेते गगन थापा आणि विश्वप्रकाश शर्मा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सप्टेंबरमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन झाल्यावर पंतप्रधान सुशीला कार्की यांनी 21 ऑक्टोबर रोजी प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेत सार्वत्रिक निवडणुकीची तयारी तसेच सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा केली होती. पंतप्रधान कार्की यांनी या बैठकीत सर्व राजकीय पक्ष्घंकडून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक करविण्यास सहकार्य मागितले होते. तर विविध पक्षांच्या नेत्यांनी सरकारला निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा आग्रह केला. यानंतर नेपाळचे गृहमंत्री ओम प्रकाश आर्यल यांनी 25 ऑक्टोबर रोजी सर्व राजकीय पक्षांना सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी रस्त्यांवर निदर्शने आयोजित करण्याऐवजी काळजीवाहू सरकारसोबत चर्चा करण्याचे आवाहन केले होते.